सतीश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा परिषदेच्या पिंपळनेर येथील शाळेत आयोजित विविध उपक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक घेतलेल्या ‘शाळे’ने अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची तर भंबेरी उडालीच; परंतु ग्रामस्थांनाही आपल्याच पाल्यांसमोर उघडे पाडले. एकमेकांचे उणेदुणे न काढता शासकीय योजना, उपक्रमाचा लाभ उठवीत गावच्या विकासासाठी सहकार्य करा, असा उपदेशही त्यांनी यावेळी केला.ऋषी चैतन्य आश्रम, नवी दिल्ली आणि सिद्धीविनायक सेवाभावी संस्था, पिंपळनेर (गणपती) यांच्या विद्यमाने पिंपळनेरच्या जि.प.शाळेत विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सकाळी बारा वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, सिद्धीविनायकचे डॉ. शिवप्रसाद चरखा, आश्रमचे चेतन करिया, मुंदडा, नाथाराम ननावरे, माजी सरपंच सतीश पाटील, भगवान जाधव, गणपत डोईफोडे, सुनील पाटील, किशोर सुरवसे, लोणकर, भगीरथ चरखा, गटशिक्षणाधिकारी मधुकर मोराळे आदी उपस्थित होते.ऋषी चैतन्य आश्रम, नवी दिल्ली आणि सिद्धीविनायक सेवाभावी संस्था, पिंपळनेर (गणपती) यांच्या सहकार्यातून जि.प.च्या १९ शाळांत राबवित असलेल्या इ-लर्निंग, शुद्धपेयजल, प्रयोगशाळा, ग्रंथालय, झापेवाडी येथील अद्ययावत शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. डॉ शिवसप्रसाद चरखा यांनी प्रास्ताविकात सेवाभावी संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. नामदेव ननावरे यांनी निर्मलग्राम योजनेत सहभागी होऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. पत्रकार गणेश सावंत यांनी सूत्रसंचालन करताना गावातील विविध उपक्रमाची माहिती पाहुण्यांना दिली.इतरांप्रमाणेच जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचीही भाषणबाजी होईल, असे वाटत असतानाच त्यांनी प्रश्नांचा भडिमार करून अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांसह ग्रामस्थांची विकेट घेतली. वृक्षारोपणापासून ते ग्रामस्वच्छतेपर्यंत आढावा घेताना तुम्ही इतरांसाठी आदर्श बना, असा सल्ला दिला. कुणाकडे स्वच्छतागृह आहे, झाडे लावलीत का, ग्रामसभा वेळोवेळी होते का?, सातबारा आॅनलाईन झाला का इ. प्रश्न जाहीर विचारले. काही ग्रामस्थांनीही तलाठी, ग्रामसेवक गावात थांबत नाहीत, वेळेवर ग्रामसभा होत नाही, अशी तक्रार केली. प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनाही साधेसोपे प्रश्न विचारून त्यांची गुणवत्ता चाचणी घेतली. अनेक विद्यार्थ्यांना उत्तरे देता आली नाहीत. याचा ऊहापोह त्यांनी जाहीर कार्यक्रमात केला नाही तर पुढच्या वेळी जेव्हा मी येईल तेव्हा त्याचा आढावा घेईल, असा इशाराच शिक्षकांना दिला. प्रत्येक विद्यार्थ्याने पाच रोपे लावून ती जगवली पाहिजेत जे विद्यार्थी चांगले यात चांगले काम करतील अशा जि.प.च्या पन्नास शाळेतील विद्यार्थ्यांना माझ्या घरी चहा, फराळासाठी निमंत्रण असेल, असे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांनाही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनीच घेतला ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांचा ‘वर्ग’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST