राजकुमार जोंधळे , लातूरचालू वित्तीय वर्ष संपण्यास कांही दिवस शिल्लक असून, ३१ मार्चपूर्वी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत व इतर योजनेअंतर्गत वितरीत निधी पूर्ण खर्च करणे बंधनकारक आहे. शिवाय सध्याला राज्य मंत्रिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच गटविकास अधिकारी, सर्व खातेप्रमुख आणि विभाग प्रमुखांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेतील कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी असली तरी, २४ ते २७ मार्च या कालावधीत सुरु ठेवण्याचे ‘विशेष आदेश’ दिले आहेत. मात्र शुक्रवारी लातूर शहरातील बहुतांश कार्यालयात शुकशुकाट होता़ काही कार्यालयात तर एकही अधिकारी-कर्मचारी नसल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये आढळून आले आहे़ शुक्रवारी दुपारी १.३० पासून ‘लोकमत’ने शासकीय कार्यालयात फेरफटका मारुन आढावा घेतल्यानंतर हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष आदेशानंतरही बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच असल्याचे दिसून आले़ जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या विविध कार्यालयात सकाळपासूनच शुकशुकाट असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून पुढे आले आहे.दुपारी १. ५५ वाजता जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयात ‘लोकमत’चा चमू पोहोचला. येथे दोन कर्मचारी उपस्थित होते. तर कार्यालय प्रमुख गैरहजर असल्याने त्यांची खुर्ची रिकामीच होती. पुढे ‘लोकमत’चा कॅमेरा २.१६ वाजता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात पोहचला. येथेही दोनच कर्मचारी उपस्थित होते. उर्वरित खुर्च्या रिकाम्याच असल्याने शुकशुकाट होता. २.२२ वाजता जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रवेशव्दारास चक्क टाळे होते. २.२८ वाजता कोषागार कार्यालयात चमू पोहोचला, तेथेही कर्मचारी उपलब्ध नसल्याने ८० टक्के खुर्च्या रिकाम्याच होत्या. जिल्हा सहकारी संस्था कार्यालयात एक सेवक, दोन कर्मचारी अशी संख्या आढळून आली. उर्वरित अधिकारी, कर्मचारी कार्यालयात नसल्याने रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या. २. ३५ वाजता सहायक निबंधक सहकारी संस्था लातूर कार्यालयात स्मृती पाटील यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. इतर कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच असल्याचे दिसून आले. यावेळी कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. लोकमतचा कॅमेरा बांधकाम विभाग कार्यालयात दुपारी २.४० वाजता फिरवला असता, येथेही कार्यकारी अभियंता वि. मु. चव्हाण यांची खुर्ची रिकामी होती. जिल्हा परिषदेच्या कृषी कार्यालयातील चार कर्मचारी वगळता इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्च्याही रिकाम्याच असल्याचे आढूळून आले. तर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशव्दाराला टाळे असल्याचे आढळून आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील बहुतांश कार्यालयांत तीन ते पाच कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. उर्वरित कर्मचारी गैरहजर असल्यामुळे सकाळपासूनच सर्वत्र शुकशुकाट असल्याचे ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढूनही कर्मचाऱ्यांची दांडी !
By admin | Updated: March 26, 2016 00:54 IST