उस्मानाबाद : सर्वच बाजुंनी होणाऱ्या टिकेमुळे कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात बॅन्ड वाजविण्याचा निर्णय मागे घेत जिल्हा बँक प्रशासनाने आता कर्जवसुलीसाठी सामंजस्याचा फॉर्म्युला हाती घेतला आहे़ मागील दोन महिन्यात जवळपास शेती, बिगर शेतीची जवळपास चार कोटी रूपयांची वसुली करण्यात बँकेला यश आले आहे़रोखे घोटाळे, विना तारण कर्जवाटप आदी विविध कारणांनी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आली आहे़ विविध प्रकारे कर्जवसुलीसाठी प्रयत्न करूनही वसुली होत नसल्याने जिल्हा बँक प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात बिगर शेती, शेतीच्या थकीत कर्जवसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीसा दिल्या होत्या़ या नोटीसीमध्ये शेतकऱ्यांच्या घरासमोर बँड लावून गांधीगिरी करीत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता़ एकीकडे दुष्काळ, कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असताना जिल्हा बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरासमोरच गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता़ या पार्श्वभूमीवर सर्वच बाजुंंनी टिका होत होती़ होणारी टिका पाहता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने गांधीगिरी आंदोलनाचा निर्णय मागे घेत शेती, बिगर शेतीच्या वसुलीसाठी सामंजस्य हा पर्याय काढून वसुली मोहीम हाती घेतली आहे़जिल्हा बँकेचे बिगर शेती संस्थेचे जवळपास २३४३ सभासद असून, यात ४६७ शेती संस्था सभासद आहेत़ उर्वरित १८७६ पैकी २१३ संस्थांना बँकेने कर्ज दिले होते़ यातील मार्च २०१६ अखेरपर्यंत बिगर शेतीचे १९८ थकीत कर्जदार होते़ या थकबाकीदारांकडे १९५ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज थकीत होते़ यापैकी ८ संस्थांकडून नोव्हेंबर अखेरपर्यंत २४ लाख ९९ हजार कर्जाची वसुली करण्यात आली होती़ तर डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत ८ संस्थांकडून ४ लाख २० हजार रूपये अशी जवळपास २९ लाख रूपये बिगर शेतीचे कर्जवसूल करण्यात आले आहे़ १९७० शेती संस्थांकडे जवळपास ७६ कोटी ९७ लाख ७१ हजार रूपयांची थकबाकी आहे़ तर १ लाख १२ हजार कर्जदार सभासदांकडे ५८५ कोटी ३७ लाख ५३ हजार रूपयांचे कर्ज थकीत आहे़ या कर्जाच्या वसुलीसाठीही बँकेने नोटीसा दिल्या होत्या़ यातील ३ कोटी ७५ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वसूल करण्यात आले आहे़ बिगर शेतीचे केवळ २९ लाख रूपये कर्ज वसूल झाले असले तरी थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ७५ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वसूल झाले आहे़ बिगर शेतीची बहुतांश प्रकरणे विविध कारणास्तव न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबीत आहेत़ परिणामी ही कर्जवसुली थांबली आहे़ दुसरीकडे दुष्काळ, नापिकीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनीच मागील चार महिन्यात सर्वाधिक ३ कोटी ७५ लाख ३७ हजाराचे कर्ज भरले आहे़
जिल्हा बँक ‘बॅकफुट’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 23:37 IST