औरंगाबाद : महापालिका नगरसेवकांची मागील ४ वर्षांपासून शिल्लक राहिलेली सुमारे १०१ कोटी रुपयांची कामे वर्ष २०१४-१५ च्या बजेटमधून कापण्यात आली आहेत. एक आठवड्यापासून स्पील ओव्हरच्या कामांवरून सेना- भाजपा नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी प्रशासनाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. प्रशासनाने मनपाची आर्थिक परिस्थिती समोर आणली आहे. त्यामुळे बजेटमधील स्पील ओव्हरची कामे काही पदाधिकाऱ्यांनी कापली आहेत काय, असा संशय नगरसेवकांना येत आहे. त्यामुळे २ आॅगस्टपासून स्पील ओव्हरच्या कामांवरून नगरसेवक विरुद्ध सत्ताधारी असे वातावरण निर्माण झाले आहे. महापौर कला ओझा यांनी ७९० कोटी रुपयांचे बजेट प्रशासनाला दिले असून त्यात अनेक नगरसेवकांची कामे कापण्यात आली आहेत. त्या कामांवरून महापौरांच्या दालनात आज आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये बैठक झाली. बैठकीत कुठलाही महत्त्वपूर्ण तोडगा निघाला नाही. मात्र, ज्या नगसेवकांचे स्पील ओव्हरचे एकही काम बजेटमध्ये नाही. त्यांचे २५ लाख रुपयांचे काम बजेटमध्ये घेण्याचा तोडगा बैठकीत निघाल्याचे विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनी सांगितले. ज्या नगरसेवकांची कामे अंदाजपत्रक तयार करण्यापर्यंत पोहोचली आहेत. ती कामे पूर्ण होतील. त्यांची नवीन स्पील ओव्हरची कामे होणार नाहीत. असाही निर्णय बैठकीत झाला आहे. बैठकीला महापौरांसह, सभागृह नेते किशोर नागरे, सभापती वाघचौरे, नगरसेवक हुशारसिंग चौहान, नगरसेविका प्रीती तोतला आदींची उपस्थिती होती. यावर्षीच्या बजेटमध्ये २२५ कोटी रुपयांची शिल्लक कामे होती. ती कामे बजेटमध्ये आली आहेत. मात्र, त्यामध्ये पुन्हा वॉर्डनिहाय कामांच्या याद्या घुसडल्या. २२५ कोटींची कामे ३२६ कोटींवर गेली. ही कामे कुणी घुसडली आणि त्यातील १०१ कोटींची कामे कुणी रद्द केली, यावरून सुरू झालेला वाद कायम राहणार आहे. १०१ कोटींपैकी किती कोटींची कामे होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विधानसभेच्या आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा यावरून वाद होतील, असे दिसते.