पालम : गोदाकाठावरील रुग्णांना पावसाळ्याच्या कालावधीत आधार देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र रावराजूर येथील कामे निधीअभावी मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. यामुळे रुग्णांना सेवा देताना कसरती करण्याची वेळ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत आहे. तालुक्यातील रावराजूर येथे आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. या केंद्रावर गोदाकाठची जवळपास १३ गावे अवलंबून आहेत. पावसाळ्यात छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर येताच या भागाचा संपर्क तुटत असतो. या कालावधीत उपचार घेण्यासाठी रावराजूरच्या आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागतो. आरोग्य केंद्राची इमारत मानव विकास मिशनअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेली आहे. परंतु इमारत नवीन असूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अजूनही या परिसरात विजेचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. तसेच निवासासाठी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. गारपिटीत इमारतीवरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या, खिडक्यांची काचे फुटून गेली आहेत. अजूनही याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत. इमारतीमधील खोल्यांची फरशी उखडली असून अर्धवट कामांमुळे कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. अपुऱ्या सेवासुविधांमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना फटका बसत आहे. यामुळे अनेक वेळा रुग्णांना गंगाखेड येथे खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ येत आहे. आरोग्य केंद्राच्या रखडलेल्या कामांसाठी निधी देण्याची मागणी सरपंच रत्नाकर शिंदे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी कामांसाठी निधी देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
निधीअभावी खोळंबली कामे
By admin | Updated: July 29, 2014 01:07 IST