विठ्ठल भिसे, पाथरीएकीकडे ग्रामीण भागातील अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी शासन स्तरावरून सतत पाठपुरावा केला जातो. त्यामुळे अंगणवाड्यांची सुधारणा होत आहे. तर दुसरीकडे अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवणारे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रात चालविले जात आहे. या कार्यालयात स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करण्यात आली खरी परंतु पाण्याअभावी स्वच्छतागृह बंदच असते. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे. पाथरी तालुक्यात १३६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये साधारणत: २७२ कार्यकर्ती आणि मदतनीस कार्यरत आहेत. तालुकास्तरावर या अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना हे स्वतंत्र कार्यालय आहे. या कार्यालयाला प्रकल्प अधिकारी वर्ग-२ चा दर्जा असणारा अधिकारी नियुक्त आहे. तसेच विभागवार नियंत्रण ठेवण्यासाठी ५ अंगणवाडी पर्यवेक्षिकांची नेमणूक करण्यात आली आहे.यापूर्वी पाथरी येथील प्रकल्प कार्यालय जुन्या इमारतीत कार्यरत होते. पंचायत समितीच्या नवीन बांधकामाच्या वेळी या कार्यालयाची इमारत पाडण्यात आली. तेव्हापासून म्हणजेच दीड वर्षापूर्वी एकात्मिक कार्यालय हे नवीन बांधकाम करण्यात आलेल्या अंगणवाडी तथा महिला साधन केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. एकवेळ केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या महिला साधन केंद्रात एक स्वतंत्र प्रशिक्षण हॉलमध्ये हे कार्यालय सुरू झाले खरे परंतु चार टेबल, आठ खुर्च्या आणि तीन कपाट या व्यतीरिक्त कार्यालयात कोणतेही फर्निचर उपलब्ध नाही. प्रकल्प अधिकाऱ्यास स्वतंत्र कक्ष नाही, अंगणवाडी पर्यवेक्षिकांना बसण्याची सुविधा नाही, अशा परिस्थितीमध्ये या कार्यालयाचे कामकाज मात्र सुरू आहे. अंगणवाड्यांतील कार्यकर्ती आणि मदतनीस यांच्यासाठी तालुकास्तरावर महिनाभरात अनेक वेळा बैठक, प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात; परंतु कार्यालयच प्रशिक्षण केंद्रामध्ये भरविण्यात येत असल्याने अंगणवाडी कार्यकर्तींचे मेळावे याच ठिकाणी घेतले जात असल्याने महिलांना बसण्यासाठी जागा उरत नाही. एकाच वेळी साधारणत: ३०० महिला ग्रामीण भागातून या कार्यालयात येत असल्याने महिलांची चांगलीच गैरसोय होत आहे. पर्यवेक्षिकांनाही सुविधा नाहीतालुक्यातील अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पर्यवेक्षिकांना तालुकास्तरावरील कार्यालयामध्ये बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आवश्यक असते. परंतु कार्यालयाची जागाच अपुरी त्यात फर्निचरची सुविधा नाही. यामुुळे अंगणवाडी पर्यवेक्षिकांनाही कार्यालयामध्ये काम करताना असुुविधांना सामोरे जावे लागत आहे.स्वच्छतागृह बंदच या इमारतीमध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आले खरे. परंतु पाण्याअभावी स्वच्छतागृह सतत बंद असते. यामुळे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिलांची चांगलीच कुचंबना होते. पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहाचा वापरही या महिलांना करू दिला जात नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.
सुविधांअभावी महिलांची गैरसोय
By admin | Updated: August 15, 2014 00:02 IST