बाळासाहेब जाधव ,लातूरबंधने घालूनही दिवाळी सणात मुलांनी वाजविलेल्या फटाक्याने डेसिबलची मर्यादा ओलांडली आहे. लातूर उपप्रादेशिक प्रदूषण कार्यालयाने केलेल्या हवेतील व ध्वनीतील गुणवत्ता तपासणीत ध्वनीप्रदूषणाने ८८़५ डेसिबलची पातळी ओलांडली असल्याची कबुली क्षेत्राधिकारी पंकज बावगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वायूप्रदूषणाचा अहवाल औरंगाबादच्या कार्यालयाला पाठविला असून, लातूर शहरात नेमके किती वायू प्रदूषण झाले याचा आकडा अहवाल न आल्याने कळू शकला नाही. हवा आणि ध्वनी प्रदूषणही दिवाळीत नित्यनियमाने होते. फटाकेमुक्त दिवाळीची रॅली काढूनही याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. उपप्रादेशिक प्रदूषण कार्यालयाच्या वतीने दिवाळीपूर्वी व दिवाळीच्या कालावधीत अशा दोन टप्प्यात प्रदूषणाचे मोजमाप घेऊन आढावा घेतला जातो. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई कार्यालयाच्या सूचनेनुसार लातूरच्या कार्यालयाने याच धर्तीवर शहरातील गंजगोलाई, केशवराज विद्यालय, दयानंद कॉलेज व एमआयडीसी भागातील पाण्याची टाकी या परिसरात ध्वनी व वायू प्रदुषणाची तपासणी केली. १६ आॅक्टोबर व २३ आॅक्टोबर या दोन दिवसाच्या कालावधीत केलेल्या तपासणीत लातूरमध्ये प्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याचे पुढे आले आहे. ध्वनीप्रदुषणाचे मोजमाप नॉईस मिटर या यंत्राव्दारे करण्यात आले असता यामध्ये १६ आॅक्टोबर रोजी केलेल्या तपासणीत ध्वनीप्रदुषणाचे मोजमाप कमीत कमी ६३.५ व जास्तीत जास्त ७४़७ डेसिबलपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले तर २३ आॅक्टोबर रोजी केलेल्या तपासणीत ते प्रमाण कमीत कमी ६४़३ व जास्तीत जास्त ८८़५ डेसिबलपर्यंत ध्वनीप्रदूषण झाल्याचे समोर आले.
दिवाळीत फटाक्यांनी ओलांडली ‘डेसिबल’ची मर्यादा
By admin | Updated: October 28, 2014 00:58 IST