सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्षीरसागर घराण्याने सर्वसामान्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला वैभव प्राप्त करून दिले. परंतु आज अशा अनेक निष्ठावंतांची पक्षात घुसमट होत आहे. पक्षातील सुसंवाद, समन्वय संपतोय की काय, अशी शंका येण्याइतपत अंतर्गत हालचाली वाढत आहेत. ह्या गोष्टी पक्षाच्या हिताच्या नाहीत, अशी खंत नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.राकाँच्या जिल्हाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची नियुक्ती झाली. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ज्या लोकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध काम केले, निवडणूक लढविली, अशा लोकांच्याच हातात पदाधिकारी निवडताना ‘व्हीप’चे अधिकार दिले होते. असा प्रकार कुठल्याच पक्षात यापूर्वी घडला नसावा. या कृतीचा निषेध म्हणून मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा तेव्हाच दिला होता. बजरंग सोनवणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली, याचा आम्हालाही आनंद आहे, त्यांच्याशी सहकार्यही असेल. परंतु पक्षश्रेष्ठींनी ही निवड करण्यापूर्वी जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींशी चर्चा करायला हवी होती. परंतु तसे घडले नाही, याचे शल्य वाटते. आम्ही पक्षासाठी काय केले? पक्ष कसा वाढविला? किती खस्ता खाल्ल्या? हे आम्हाला सांगायची गरज वाटत नाही. कारण जिल्ह्याला हे माहीत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार जयसिंग गायकवाड यांना ४० हजार मताधिक्याने निवडून आणले होते. उमेदवार कोणीही असो, पक्ष महत्त्वाचा, हा गुण आमच्या रक्तात आहे. परंतु भाजपमधूनचे ‘आयाराम’ आम्हाला निष्ठेचे धडे देत आहेत.पालिकेतील घटना घडामोडी संदर्भात ते म्हणाले, विकासाचे सकारात्मक राजकारण करणे हा आमचा स्वभाव आहे. परंतु व्यक्तिद्वेषातून काही मंडळी पालिकेत आली, विकास सोडून वैयक्तिक हेव्यादाव्यातून पालिकेतील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे, ही गोष्ट निंदनीय आहे.प्रस्तावावर सह्या होत नाहीत, विरोध केला जातो, असा आरोप केला जातो. परंतु एखादा प्रस्ताव, निर्णय जर पालिकेच्या हिताचा नसेल तर कितीही दबाव असेल तर तो, मी मान्य असा करेल, असे सांगताना त्यांनी कचऱ्याच्या टेंडरचे उदाहरण दिले. कचरा उचलण्यासाठीच्या घंटागाडीचे टेंडर दुप्पट दराने आले होते. नियमानुसार टेंडरची संख्या ३ आवश्यक असतानाही दोनच होते. या कारणास्तव आणि नियमाप्रमाणे मी या टेंडरला विरोध केला, तो वैयक्तिक भावनेतून नाही तर पालिकेच्या हितातून घेतला होता.
पक्षातील सुसंवाद संपतोय...निष्ठावंतांची घुसमट - भारतभूषण क्षीरसागर
By admin | Updated: June 10, 2017 00:03 IST