बाजारसावंगी : सुलतानपूर, बाजारसावंगी, लोणी, येसगांव, ताजनापूर, माटरगांव, वढोद, जानेफळसह परिसरातील इतर गावात वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. दररोज रात्रीच्या वेळी परिसरातून पंचवीस ते तीस ट्रॅक्टर सतत ये-जा करीत वाळू चोरत असल्याचे समोर आले आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
बाजारसावंगी व सुलतानपूर परिसरातील नदी, नाले तसेच स्मशानभूमी परिसरासह लोणी, बोडखा, दरेगांव, पाडळी, येसगांव, माटरगांव व गिरीजामध्यम प्रकल्प परिसरात वाळू माफियांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. या परिसरातून दररोज वाळूची चोरी होत असून परिसरातील अनेक गावांत अवैधप्रकारे वाळूचा साठा करण्यात आला आहे. दररोज दिवसरात्र या भागातून वाळू वाहतूक होत असताना पोलीस प्रशासन, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार या सर्वांकडून वाळूमाफियांना अभय मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वी दोन ते तीन हजार रुपये प्रतिब्रास वाळू विक्री होत होती. लॉकडाऊननंतर त्यात वाढ होऊन तीन ते चार हजार रुपये प्रतिब्रास झाली आहे. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनास हप्ते जात असल्याने ते या वाळूचोरीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.