संजय जाधव , औरंगाबादपैठण येथील ज्या जलाशयातून औरंगाबादकरांची तहान भागविली जाते त्याच औरंगाबाद मनपाने पैठण तालुक्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविले आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतरही मनपा व औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कं.तील पत्र प्रवासाचा गोंधळ मिटत नसल्याने फारोळा व ढोरकीन येथील जलशुद्धीकरण केंद्रातून टँकर भरण्यास पॉइंट देण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे पैठण तालुक्यातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. पैठण तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, दिवसागणिक टंचाईची दाहकता वाढत आहे. सध्या ५४ टँकरने ४१ गावांची तहान भागवली जाते. या आठवड्यात आणखी ५० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. सध्या मुधलवाडी पॉइंटवर फक्त ९६ वेळा टँकर भरले जाते. या पॉइंटवर ३६ गावांना पाणीपुरवठा करणारे ४९ टँकर ९६ वेळेस भरण्याचे नियोजन आहे. येथून थेरगाव, दादेगाव, हार्षी, रांजणगाव दांडगा, पुसेगाव, खेर्डा, पाचलगाव, मुरमा, बालानगर, कुतूबखेडा, ढाकेफळ, वरूडी, कासार पाडळी, कोळीबोडखा, यासिनपूर, नानेगाव, वडजी, ववा, लिंबगाव, नांदर, कडेठाण, पाचोड आदींसह ३६ गावांचे टँकर पाणी भरण्यासाठी येतात. त्यामुळे येथे वेळेवर पाणी मिळत नाही, त्यामुळे नियोजित खेपाही होत नाहीत. मनपाने टँकरसाठी पॉइंट देण्याबाबत पत्र आम्हाला दिले आहे; मात्र किती टँकर भरणार, किती खेपा होणार याची सविस्तर माहिती आम्ही मनपाकडे मागवली आहे. याचे उत्तर आम्हाला अजून मिळाले नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही रखडली आहे -शिवा नागे, व्यवस्थापक, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी.
धरण उशाला... पण मनपामुळे कोरड पैठणकरांच्या घशाला
By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST