तुळजापूर : रविवारची सुटी गाठून चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी शहरात हजेरी लावली. दरम्यान, उन्हापासून संरक्षित होण्यासाठी प्रशासनाकडून कसल्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने भाविकांना याचा त्रास सहन करावा लागला.सोमवारी चैत्र पौर्णिमा असल्याने रविवारी दुपारपासूनच भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येथे मोठी गर्दी केली होती. विशेषत: भवानी रोड, महाद्वार रोड, खडकाळ गल्ली या भागात भाविकांची अधिक गर्दी दिसून आली. सकाळी १० वाजताच मंदिरातील दर्शन मंडप हाऊसफुल्ल झाला होता. त्यामुळे मंदिर प्रशासनाने ऐनवेळी व्हीआयपी दर्शनही बंद केले. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापुरात येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने महाद्वार परिसरात सावलीसाठी नेट बांधावी, तसेच रस्त्यावर मॅट टाकावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाविकांना रखरखत्या उन्हात मंदिर गाठून श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घ्यावे लागले. यात्रेनिमित्त तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे आदेश मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले होते; परंतु प्रशासनाकडून या आदेशाचेही पालन झाले नसल्याचे दिसून येत आहे.(वार्ताहर)
तुळजापुरात भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 23:37 IST