संजय कुलकर्णी , जालना शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीच्या बांधकामास अखेर मुहूर्त लागला असून यासंबंधीची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३८ दिवसानंतर या कामासाठी एजन्सी निश्चित होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. जानेवारी २०१५ मध्ये नगरविकास खात्याकडून बीओटी तत्वावर या इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. नगरपालिकेच्या मालकीची ही इमारत अत्यंत जीर्ण झाल्यामुळे २००५-०६ मध्ये पाडण्यात आली होती. सुरूवातीला व्यापाऱ्यांचा विरोध, त्यानंतर त्यांची संमती, व्यापाऱ्यांचे इतरत्र स्थलांतर या बाबींमध्ये काहीवेळ गेला. त्यानंतर या ठिकाणी नवीन इमारत तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र गेल्या आठ वर्षांपासून इमारतीच्या बांधकामास तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. विभागीय आयुक्त कार्यालयात यासंबंधीची संचिका दीर्घकाळ प्रलंबित होती. फुले मार्केटची नवीन इमारत केव्हा होणार, याविषयीची शहरातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणताही निर्णय होत नसल्याने या इमारतीच्या बांधकामला मुहूर्त केव्हा लागणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर आता ई-निविदा प्रसिद्ध झाल्याने आगामी दीड महिन्यांच्या कालावधीनंतर प्रत्यक्षात कामास सुरूवात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या कामामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत प्रभारी नगराध्यक्ष शाह आलमखान म्हणाले, हे काम मार्गी लागावे, यासाठी गेल्या एक वर्षापासून नगरपालिका सतत प्रयत्नशील होती. आगामी दीड महिन्यांच्या काळात एजन्सी नियुक्त करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला जाणार आहे. हे काम उच्च दर्जाचे व पारदर्शक व्हावे, यासाठी नगरपालिका प्रयत्नशील असल्याचेही प्रभारी नगराध्यक्ष शाह आलमखान यांनी सांगितले. महात्मा फुले मार्केटचा परिसर ६ हजार ५५ स्क्वेअर मीटर असून इमारत बांधकामाचा कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे. ही इमारत चार मजली राहणार आहे. यात भूमिगत तळमजल्यावर पार्किंग, पहिला व दुसऱ्या मजल्यावरील २८३ गाळे जुन्या मालकांना देण्यात येणार आहेत. याशिवाय २, ३ व ४ था मजला विकासकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ४विकासकाच्या ताब्यात ५ हजार ८३० स्क्वेअर मीटरची जागा असणार आहे. इमारत बांधकामासाठीचे आरक्षित अधिमूल्य ३ कोटी ९७ लाख रुपये एवढे आहे. म्हणजे ज्या एजन्सीला या बांधकामाचे कंत्राट घ्यायचे आहे, त्यांना या रक्कमेपेक्षा अधिक बोली बोलावी लागणार आहे. ४गेल्या आठ वर्षांपासून महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीचे काम रेंगाळले होते. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन पातळीवर मोठे प्रयत्न केले. नगरपालिकेच्या माध्यमातूनही त्यासाठीचा पाठपुरावा सुरू होता. ४हे काम लवकर मार्गी लागणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. फुले मार्केट परिसर हा शहराची शान समजला जातो. येथील पार्किंग व्यवस्थेमुळे रस्त्यावर लागणाऱ्या वाहनांच्या वेड्यावाकड्या रांगाही दिसणार नाहीत.
फुले मार्केटच्या उभारणीला मुहूर्त लागला
By admin | Updated: May 10, 2015 00:19 IST