लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दीड वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाचा कायापालट होण्याची स्वप्ने दाखविली जात आहे. तसा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे विभागीय कार्यालय परभणी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही याबाबत हालचाली होताना दिसून येत नाहीत. विकासासाठी प्रथम दोन कोटींची नंतर साडेचार कोटींची तजविज केली होती. मात्र अजून प्रत्यक्ष कामाचा काही पत्ताच नसल्याचे चित्र आहे.मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बसस्थानकाचा विकासच न झाल्याने कर्मचाºयांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होते. हिंगोली बसस्थानकाच्या विकासासाठी प्रथम दोन कोटी खर्च करण्यात येणार होते. परंतु ते अपुरे पडत असल्याने कंत्राटच घेण्यास कोणी तयार नव्हते. त्यामुळे विकास आराखड्याची रक्कम चार ते साडेचार कोटी करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयाकडून दिली जात आहे. वेळोवेळी ई-निविदा तयार करूनही विकास आराखड्याच्या कामांसाठी जागेचे केवळ मोजमाप घेतले जात आहे. दीड वर्ष लोटून गेले अद्याप कुठल्याच कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. आता तर जीएसटीमुळे कंत्राटदाराच निविदेकडे पाठ करून बसले आहेत. आगारात एकूण ५६ बसेस असून जवळपास ३०० च्यावर कर्मचारी आहेत. बसस्थानक जिल्ह्याच्या ठिकाणी असून येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सुविधा उपलब्ध नसल्याने मात्र प्रवाशांची गैरसोय होते. विशेष म्हणजे स्थानकात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची दैना होते.
बसस्थानकाचा विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:45 IST