वाळूज महानगर : गोलवाडी-तीसगाव परिसरात लष्कराच्या हद्दीतील जळालेली झाडे जगविण्यासाठी वृक्षप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. आठवडाभरापूर्वी या परिसरात आग लागून शेकडो झाडे होरपळली होती. या होरपळलेल्या झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी वृक्षप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. ही झाडे जगविण्यासाठी साफसफाई मोहीम राबवून झाडांना टँकरने पाणी देण्यात येत आहे.
---------------------------
पंढरपूर-रांजणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी
वाळूज महानगर : पंढरपूर-रांजणगाव या रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली असून वाहनेही दुकानासमोरच उभी करतात. हातगाडीवर व्यवसाय करणारेही रस्त्यावर उभे असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. अडथळा करणाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----------------------
कमळापूर रस्त्यावर अस्वच्छता
वाळूज महानगर : कमळापूर रस्त्यावर केरकचरा टाकला जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. रांजणगावातील नागरिक या रस्त्यावर केरकचरा आणून टाकत असल्याने रस्त्यावर अस्वच्छता पसरत आहे. यामुळे मोकाट जनावरांचा रस्त्यावर वावर वाढला आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक दाबूनच ये-जा करावी लागत आहे.
-------------------