औरंगाबाद : गणेश विसर्जन मिरवणुकीवरील संभाव्य अतिरेकी हल्ला रोखण्यास पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. विसर्जन मार्गावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रण केले जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे दोन हजार समाजकंटकांची धरपकड करण्यात आल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. गणेश विसर्जन मिरवणुकीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची कसलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करून पोलीस आयुक्त म्हणाले की, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इसिस समर्थक अतिरेक्यांना अटक केल्याच्या काही घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीत सावधगिरी बाळगण्यात येणार असून, त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. विसर्जन मार्गावर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या सुमारे दोन हजार समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र आणि जामीनपात्र वॉरंट तसेच समन्स बजावण्यात आले आहेत. ६७ गुंडांना आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले असून, तीन जणांवर ‘एमपीडीए’ लावण्यात आल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले.
समाजकंटकांची शहरात धरपकड
By admin | Updated: September 15, 2016 00:37 IST