विकास राऊत
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलच्या नूतन इमारतीत सुमारे अडीच कोटींचा खर्च विद्युतीकरणा (इलेक्ट्रिक फिटींग) वर करण्यात आला. तरीही विद्युत उपकरणांना ‘विटां चा आधार देऊन काम भागवावे लागत आहे. यातनूच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने कसे काम केले याची प्रचिती येते. दुसरीकडे घाटीतील इलेक्ट्रिक फिटींगला दोन तपांहून अधिक काळ लोटला आहे. दरवर्षी ८ ते १० लाख रुपयांच्या दुरुस्तीची कामे घाटी रुग्णालयासाठी केली जातात. सिव्हिल हॉस्पिटलची इमारत नवीन असल्यामुळे दरवर्षी कागदोपत्री फायर ऑडिट करून सर्व काही सुरळीत असल्याचे दाखविले जात आहे.
भंडाऱ्यात झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत १० नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या घटनेची दखल घेतली गेली. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल्सच्या वीज आणि फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे एकेक प्रकरणे आता बाहेर येऊ लागली आहेत.
‘लोकमत’ने १२ जानेवारीच्या अंकात ‘सिव्हिलमध्ये रंगला लिंगोरचा खेळ’ या मथळ्याली विटांच्या थरांचा आधार देत विद्युत उपकरणांना वीजपुरवठा करावा लागत असल्याचे वृत्त प्रकाशित केल्यामुळे विद्युत विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
१३ जिल्ह्यांच्या रुग्णांचा भार असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटीतील विद्युतीकरणाचे जाळे जुने झालेले आहे. विविध विभाग असलेल्या या घाटीचेही फायर अॅण्ड इलेक्ट्रिसिटी ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
घाटी, सिव्हिलच्या फायर ऑडिटच्या सूचना
पीडब्ल्यूडी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनकर यांनी सांगितले, घाटीमध्ये दुरुस्तीची कामे नियमित केली जातात. घाटी आणि सिव्हिल हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्युतीकरणासाठी बजेट नसते, मागणीनुसार कामे करावे लागतात. घाटी आणि सिव्हिलच्या दुरुस्त्यांसाठी ८ ते १० लाख रुपयांचा खर्च होतो.
मिनी घाटीवर २५ कोटींचा खर्च
मिनी घाटीवर २५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यातील १० टक्के खर्च हा विद्युतीकरणावर खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या तुलनेत अडीच कोटी रुपयांचा चुराडा विद्युतीकरणावर झाल्याचे दिसते. असे असतानाही त्या इमारतीत इलेक्ट्रिक वायर लोंबकळणे, स्वीच बोर्ड खराब असणे, विटांच्या आधारे उपकरणे ठेवल्याचे दिसते. कोट्यवधी रुपयांची इमारत असून त्यामध्ये महागडी वैद्यकीय उपकरणे आहेत. असे असताना तेथील वीजपुरवठा यंत्रणा आतून पोखरलेली दिसते.