हिंगोली : जिल्हा पोलिस विभागातील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रवास व आहार भत्ता वेळेवर मिळत नाही. सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील ९ महिन्यांपासून भत्याविना कार्य करावे लागत आहे. दरम्यान, वारंवार मागणी करूनही भत्याकडे दूर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांचे लक्ष कामापासून विचलित होत आहे. जिल्ह्यात जवळपास १ हजारांच्या पूढे तृतीयश्रेणी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेची जबाबदारी असल्याने नेहमी कार्यस्थळी ये-जा असते. वर्षभरातील अधिक कालावधी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर राहवे लागते. घरांपासून दूर राहावे लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरच्या जेवनाशिवाय पर्याय नसतो. ग्रामीण भागात अनेकवेळा उपासमारीची वेळ कर्मचाऱ्यांवर येते. अशा स्थितीत दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन होत नाही. त्याहीपेक्षा मागील ८ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना प्रवास तसेच आहार भत्ता मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांकडून वारंवार भत्याची मागणी केली जाते; परंतु कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचाऱ्यांची संघटना नसल्याने प्रत्येक जणांनी केलेल्या वेगळ्या मागणीला प्रतिसाद मिळत नाही. संघटनेअभावी कर्मचाऱ्यांच्या या समस्येला अद्याप कोणी वाचा फोडलेली नाही. परिणामी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा कमी-अधिक प्रमाणात असलेला भत्ता वाटप केला जात नाही. मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी लवकर प्रवासभत्ता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याला आज दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना आगामी काळात विधानसभेची निवडणूक होवू घातली आहे. निवडणुकीच्या पूर्वीपासून रखडलेल्या भत्यामुळे कर्मचाऱ्यांना अर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. दैैनंदिन कामांत कर्मचाऱ्यांचे लक्ष लागत नाही. कामांवर परिणाम होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. शिवाय कार्यालयीन कारकूनांकडून इतरही बिले वेळेवर काढली जात नाहीत. अल्पश: कामांसाठी देखील काही कारकून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. वरिष्ठांनी या समस्येकडे लक्ष देवून पगार तसेच भत्ते वेळेवर देण्याची मागणी तृतीयश्रेणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
भत्यांपासून पोलिस वंचित
By admin | Updated: June 26, 2014 00:41 IST