परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील व अंबाजोगाई तालुक्यातील अंबलवाडी गावातच कन्हेरवाडी पाझर तलाव भरलेला असूनही नळ योजनेचे काम बंद आहे. मागील दोन वर्षांपासून अंबलवाडीकर ग्रामस्थांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामस्थांना खड्डे पाडून पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.परळीपासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या अंबलवाडी येथे नळ योजना मंजूर झालेली आहे. मात्र ती अद्यापही कार्यान्वित नसल्याने येथील ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अंबलवाडी तलावातील पाणी पूस वीसखेडी योजनेला पुरवठा केला जातो. पूस येथे जलशुद्धीकरण होऊनही अंबलवाडी ग्रामस्थांना मिळत नाही. धरण उशाला असूनही अंबलवाडीच्या ग्रामस्थांच्या घशाला कोरड आहे. नळ योजना कार्यान्वित नसल्याने तलावाशेजारी खड्डे खोदून त्यातील पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावाजवळ असणाऱ्या पाझर तलावात मुबलक पाणीसाठा असूनही नळ योजनेचे पाणी प्यायला मिळत नसल्याचे येथील सुरेश गर्जे, दीपक गर्जे, संजय गर्जे यांनी सांगितले.पूस पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन अनेक दिवसांपासून फुटलेली आहे. ती अद्यापही दुरुस्त झालेली नाही. याकडे दुरुस्ती विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रामदास गर्जे यांनी केला आहे. खड्ड्यातील पाणी प्यावे लागत असल्याने ते दूषित असून, त्यापासून विविध आजार जडत असल्याचे बिभीषण गर्जे यांनी सांगितले. उलटी, संडास यासारखे विविध आजार मागील अनेक दिवसांपासून येथील ग्रामस्थांना झाले असल्याचे चंद्रकांत दहीवडे यांनी सांगितले. अंबलवाडी येथे सुमारे आठशे घरे आहेत. मात्र या घरांना मागील दोन वर्षांपासून नळ योजनेचे पाणी प्यायला मिळालेले नाही.हातपंपही बंदअंबलवाडी रस्ता व पाझर तलावाजवळील दोन हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. विशेष म्हणजे गावात केवळ हे दोनच हातपंप असून तेही बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अंबलवाडी ग्रामस्थांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून, नळ योजनेबाबत पाठपुरावा करू, असे आ. धनंजय मुंडे यांनी सांगितले तर जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे गोविंद भुजबळ म्हणाले, या योजनेत अंबलवाडीचा समावेश आहे. नळ योजनेचे पाणी सुरू आहे. कधी वीज तर कधी पाणीपट्टीच्या समस्या असतात, त्यामुळे अडचणी येत आहेत. (वार्ताहर)धरण उशाला कोरड घशाला..!
अंबलवाडीकर ग्रामस्थ नळ योजनेपासून वंचित
By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST