---
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ५५ प्रस्ताव मदतीला पात्र
--
औरंगाबाद : जिल्ह्यात २०१९-२० मध्ये शेतकरी आत्महत्येत घट झाल्याची माहिती प्रेरणा प्रकल्पाकडून जिल्हा परिषदेत सादर करण्यात आली. या वर्षात ६१ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी ५५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव मदतीला पात्र ठरले, तर ७ प्रस्ताव अपात्र ठरल्याचे जिल्हा समन्वयकांकडून सांगण्यात आले.
---
जिल्हा परिषदेच्या मैदानावर
मोकाट जनावरांचा अडथळा
--
औरंगाबाद : जिल्हा परिषद मुख्यालयाच्या मागील बाजूचे मोकळे मैदान मोकाट जनावरांसाठी गोठाच ठरतो आहे. या परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा विभागाची कार्यालये आहेत. त्यातील कर्मचाऱ्यांना या जनावरांचा अडथळा होत असल्याने काम करणे अवघड बनल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मनपा आयुक्तांकडे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
दिव्यांगांच्या अपूर्ण घरकुलासाठी
६४ लाख २५ हजारांचा निधी
--
औरंगाबाद : दिव्यांगांच्या २०१९-२० मध्ये मंजूर अपूर्ण घरकुलांसाठी चालू आर्थिक वर्षात पंचायत समिती स्तरावर ६४ लाख २५ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. कोरोनाच्या निर्बंधानंतर प्राप्त होणाऱ्या निधीतून विनाअट ही योजना राबवण्यात येणार आहे. असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवराज केंद्रे यांनी कळवले आहे.
---
दिव्यांगांच्या पायाभूत सुविधांसाठी ६४.५० लाखांचा निधी
---
औरंगाबाद : दिव्यांगांसाठी डे केअर सेंटर्सची जिल्हा पुनर्वसन केंद्रात स्थापना करण्यासाठी १९.५० लाख, लवकर निदान व त्वरित उपचारासाठी अर्ली डिटेक्शन सेंटर सिल्लोड, कन्नड, वैजापूर आणि सोयगाव येथे तालुकास्तरावर प्रस्तावित असून, त्यासाठी प्रत्येकी दहा लाखांप्रमाणे ४० लाखांचा निधी २०२०-२१ मध्ये मंजूर आहे, तर जनजागृतीसाठी ५ लाख रुपये असा ६४ लाख ५० हजार रुपयांचा निधी अपंग कल्याणार्थ सामूहिक योजनेतून पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मोनाली राठोड यांनी दिली.
---