कन्नड : येथील उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग कार्यालयात प्रतिनियुक्त्यांचा महापूर आल्याने कार्यालयच आपद्ग्रस्त झाले आहे. विभागीय आयुक्तांनी प्रतिनियुक्त्या रद्द करून कार्यालय वाचवावे, अशी मागणी होत आहे.कन्नड उपविभागीय अभियंता कार्यालयांतर्गत अंबाडी, गडदगड, नारंगी व बोरदहेगाव हे मध्यम प्रकल्प आणि १८ लघु तलाव आहेत. या कार्यालयाची तीन भागांत विभागणी आहे. कार्यालयीन विभागात असलेल्या पदांपैकी वरिष्ठ लिपिकाचे एक पद मंजूर आहे.हे पद भरलेले आहे; पण तरीही हे पद रिक्तच आहे. कारण प्रतिनियुक्ती. कनिष्ठ लिपिकाची दोन पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पद कार्यरत आहे व एक रिक्त आहे; पण प्रत्यक्षात दोन्ही पदे रिक्तच आहेत. कारण कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर बदली आहे. परिणामी कार्यालयात कनिष्ठ लिपिक नसल्याने शिपाई त्यांचे काम करीत आहे.कन्नड शाखेतील मोजणीदार पदांपैकी एक प्रतिनियुक्तीवर गेलेला आहे. नागद शाखेतील एकमेव दप्तर कारकूनही प्रतिनियुक्तीवर, तसेच शिपाई प्रतिनियुक्तीवर गेलेला आहे.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिनियुक्ती करताना आयुक्त कार्यालयाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मग या प्रतिनियुक्ती करताना या निर्देशाचे पालन झाले आहे काय? याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरीही...प्रतिनियुक्ती जास्तीत जास्त वर्ष-सहा महिन्यांपर्यंत होऊ शकते; मात्र प्रतिनियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. याचा अर्थ या कर्मचाऱ्यांची या कार्यालयास आवश्यकत नाही, असे वरिष्ठ कार्यालयास वाटते का? जर आवश्यकता नसेल तर मंजूर पदांची संख्या कमी करावी किंवा आवश्यकता वाटत असेल तर प्रतिनियुक्त्या रद्द करून त्यांना या कार्यालयात पाठवावे.
प्रतिनियुक्त्यांचा घोडेबाजार
By admin | Updated: July 2, 2014 01:02 IST