लातूर : लातूरचा कचरा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे मिटण्याचे अजूनही नाव घेत नाही. ग्रामस्थ व पालिकेत सातत्याने कचऱ्यावरून वादावादी सुरू आहे. गेल्या नऊ दिवसांच्या ब्रेकनंतर मनपा प्रशासनाने आता कडक पावले उचलली असून पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़ शुक्रवारी एमआयडी पोलिस ठाण्याने १५ जणांचा ताफा डेपोवर बंदोबस्तासाठी दिला आहे़ ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रशासन आता कारवाईला लागले आहे़ जवळपास १ हजार टन कचरा शहरात पडून आहे़ मनपा प्रशासन व वरवंटी शिवारातील ग्रामस्थांचा कचऱ्यावरून वाद सुरू आहे.त्यामुळे मनपाच्या जवळपास ४० वाहनांमध्ये कचरा तसाच भरून ठेवण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी मनपाच्या अधिकाऱ्यांनी तीन-चार वाहने डंम्पिंग ग्राऊंडकडे नेली होती. याची माहिती मिळताच तीन ते चार ग्रामस्थांनी ही वाहने अडवून त्यावर दगडफेक केली. घटनास्थळी उपस्थित असलेले स्वच्छता विभाग प्रमुख राऊत व निरीक्षक शिंदे यांच्यासोबतही ग्रामस्थांची वादावादी झाली. शिंदे यांच्याशी ग्रामस्थांनी धक्काबुक्की केल्याचा दावाही मनपाकडून करण्यात येत आहे. या वादाची माहिती पालिकेत मिळताच कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन लेखणी बंद आंदोलन केले. ग्रामस्थांचा वाढता विरोध लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने गुरूवारी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला़ यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्रशासनाने अर्ज देवून पोलिस बंदोबस्ताची मागणी केल्यामुळे बंदोबस्त देण्यात आला. (प्रतिनिधी)आराखडा द्या... नवीन कचरा टाकण्यापूर्वी डेपोवरील लक्षावधी टन साचलेला कचरा कसा निस्तरणार, याचा कृती आराखडा देण्याची मागणी करतानाच सद्य:स्थितीत वाहने डेपोेवर आणू नयेत, असे ग्रामस्थांनी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे कळविले आहे. हरित न्यायाधिकरणाचा आदेश मनपा पाळत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
पोलिस संरक्षणात जाणार डेपोवर कचरा
By admin | Updated: July 12, 2014 01:14 IST