लातूर, हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला़ परंतु, या मतदारसंघात २००४ पासून भाजपाने काँग्रेसला धक्के देणे सुरु केले आहे़ यावेळच्या निवडणुकीत भाजपाने मोठे मताधिक्य मिळवून बाजी मारली. तशी येथील लढत परंपरेने काँग्रेस अन् भाजपातच झालेली आहे. तरीही अपक्षांची या मतदारसंघात चांगलीच भाऊगर्दी असते. यावेळीही तब्बल १३ अपक्ष रिंगणात उभे होते. परंतु, मतदारांनी नेहमीप्रमाणे त्यांना क्लीनबोल्ड केले. यंदाच्या निवडणुकीत तर १३ अपक्षांची भाऊगर्दी होती. त्यांच्यासह सपा, बसपा व आप या मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांचेही अनामत जप्त झाली आहे़ अपक्षांंची कॉन्टिटी वाढली तरी क्वालिटी वाढली नसल्याचे या निकालावरून स्पष्ट होते. काँग्रेसकडून शिवराज पाटील चाकूरकर यांनी सलग सातवेळा तर जयवंतराव आवळेंनी एकवेळा विजय प्राप्त केला आहे. भाजपाकडून यंदा निवडून आलेले डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह रुपाताई पाटील निलंगेकर व पहिल्या निवडणुकीत शेकापकडून यु.एस. पाटील यांनी प्रत्येकी एकवेळा विजय मिळविला आहे. अपक्षांची मात्र या मतदारसंघात नेहमीप्रमाणे कामगिरी निराशजनकच राहिली आहे. निवडून येणे तर दूरच, आजतागायत या मतदारसंघात अपक्षांची साधी हवाही झाली नाही. यंदाच्या निवडणुकीत १८ उमेदवारांपैकी तब्बल १३ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे होते. मात्र त्यांची गत नेहमीप्रमाणेच झाली आहे. स्वतंत्र लातूर लोकसभेच्या आतापर्यंत अकरा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. यात काँग्रेसने तब्बल आठवेळा, भाजपने दोनवेळा तर शेकापने एकवेळा गड जिंकला आहे. परंतु, आजतागायत याठिकाणी अपक्षांना एकदाही यश मिळाले नाही. लातूर लोकसभेची स्वतंत्र निवडणूक १९७७ पासून सुरू झाली. पहिल्या लढतीत केवळ एकच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभा होता. यानंतर प्रत्येक लढतीत अपक्षांची भाऊगर्दी वाढू लागली. १९८० च्या निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर, शेकापचे भाई उद्धवराव पाटील यांच्यात लढत न होता अपक्ष उमेदवार एम़एस़ सोनवणे यांनीच लढत दिली़ तब्बल ६४ हजार ८१ मते त्यांनी मिळविली होती़ हा अपवाद वगळता अपक्ष लोकसभेच्या लढतींमध्ये कधीही दखलपात्र ठरले नाहीत़ १९९६च्या निवडणुकीत सर्वाधिक २२ अपक्ष उमेदवार रिंगणात होते़ यावेळीही ते फेल ठरले़ राष्ट्रीयीकृत पक्षालाच लातूरच्या मतदारांनी पसंती दर्शविली आहे़
१६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
By admin | Updated: May 17, 2014 00:21 IST