रेणापूर : स्वउत्पादित सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरताना बहुतांशी शेतकऱ्यांनी विशेष काळजी व उपाययोजना न केल्यामुळे यावर्षी सोयाबीन काही ठिकाणी उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तालुक्यात यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे खरीपाच्या पेरण्या तब्बल पंधरा दिवस उशिरा कराव्या लागल्या. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणीसंदर्भात तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव म्हणाले, यावर्षी सुरुवातीलाच पेरणीयोग्य पाऊस नसतानाही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर पेरण्या केल्या. त्याचा परिणाम उगवण शक्तीवर झाला. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरताना विशेष काळजी न घेतल्यामुळे बियाणाची उगवण झाली नसावी. तसेच ग्राम बिजोत्पादन पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातून बियाणाची निवड न करणे, प्रमाणित बियाणांपासून आलेल्या उत्पादनातून बियाणे चाळून न घेणे, चांगल्या प्रतीच्या बियाणाचा अभाव सोयाबीन बियाणाची मोठ्या प्रमाणात उगवण झाली नसावी असेही ते म्हणाले़ (वार्ताहर)
कृषी विभागाचा अंदाजावरच भर !
By admin | Updated: August 12, 2014 01:58 IST