केज : येथील मंगळवार पेठ भागातील एका १४ वर्षीय युवकाचा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्याला डेंग्यू झाला असल्याचे समोर आले आहे़सूर्यकांत अशोक नाईकवाडे असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत याला ताप येत असल्याने त्याच्यावर केज येथील दवाखान्यात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्याला घरी पाठविण्यात आले होते़ मंगळवारी त्याची तब्येत गंभीर बनल्याने त्यास अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ दवाखान्यात नेताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला़ केज उपजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार झाले नसल्याने त्याचा ताप वाढला होता़ त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप सूर्यकांतच्या कुटुंबियांनी केला आहे़ दरम्यान, जिल्ह्यात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सरकारी व खाजगी दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यू आजार वाढत चालला असल्याने केज शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे़ (वार्ताहर)
डेंग्युने युवकाचा मृत्यू
By admin | Updated: August 6, 2014 02:25 IST