औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाल्यामुळे अनेक वॉर्डांत दोन दोन मतदान यंत्रांचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडे १३४१ मतदान यंत्रांची मागणी केली आहे. ही मतदान यंत्रे पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, कोणत्या तालुक्याकडे किती मतदान यंत्रे आहेत, याची माहिती गोळा केली जात आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पालिकेच्या ११३ वॉर्डांसाठी येत्या २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण २०३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत उद्या संपत आहे; पण त्यानंतरही अनेक वॉर्डांत पंधरापेक्षा जास्त उमेदवार राहण्याची शक्यता आहे, असे झाल्यास त्या-त्या वॉर्डात दोन दोन मतदान यंत्रे वापरावे लागणार आहेत. ही शक्यता लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडे आणखी १३४१ मतदान यंत्रांची मागणी केली आहे. यामध्ये ११६० बॅलेट युनिट आणि १८१ कंट्रोल युनिटचा समावेश आहे.याशिवाय मतदान यंत्रांसाठी आवश्यक ४०४ मेमरी कार्डही मागण्यात आले आहेत. पालिकेकडून मागणी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आता ही मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेली राज्य निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे तालुकास्तरावर आहे. त्यामुळे कोणत्या तालुक्यात किती मतदान यंत्रे आहेत, याची माहिती जमा करण्यात येत आहे.
प्रशासनाकडे १३४१ मतदान यंत्रांची मागणी
By admin | Updated: April 14, 2015 01:06 IST