वडवणी : महाराष्ट्र शासनाने गावपातळीवर निर्माण होणारे छोटे-मोठे, भांडणे, तंटे गाव पातळीवरच मिटले जावेत व गावागावात शांतता अबाधित रहावी, पोलीस प्रशासनासमोरील ताण कमी व्हावा या उदात्त हेतुने प्रत्येक तालुक्यात महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू केली. आज ही मोहीम राज्यभर गतीमान होत असून, वडवणी तालुक्यात मात्र याची उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात सर्वत्र या मोहिमेचा बोजवारा उडाला आहे.वडवणी ठाण्यांतर्गत ४६ गावांचा समावेश होतो. या ४६ गावांचा कारभार ३६ ग्रामपंचायतीमधून चालतो. ३६ ग्रामपंचायतींसाठी एक पोलीस ठाणे असून यामध्ये दोन अधिकारी व ४० कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षाच्या १५ आॅगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समितीची निवड केली जाते. परंतु या चळवळीचे उद्देश, स्वरुप हे मागे पडत आहे. गावासाठी मिळणारे बक्षीस, मूल्यमापनाचे निकष याबाबतीत प्रशासनाकडून पाहिजे त्या गोष्टीबाबत आवश्यक प्रचार व प्रसार होत नाही. तसेच स्थानिक पोलिसांबाबतची मोहिमेच्या कामामधील उदासिनता, ग्रामस्थ, ग्रामसेवक, सरपंच यांचे दुर्लक्ष या मोहिमेस उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.वडवणी तालुक्यात ३६ ग्रामपंचायती असूनसुद्धा एकाही ग्रामपंचायतने यावर्षी तंटामुक्त मोहिमेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे तालुक्यात अभियानाचा बोजवारा उडाला आहे.स्वातंत्र्यदिनादिवशी एकाही ग्रामपंचायतीने तंटामुक्ती समिती स्थापन केल्याचे दिसून येत नाही. चालू वर्षात एकाही गावाचा या मोहिमेत सहभाग नसल्याने संताप व्यक्त होत आहे. शासनाने सुरू केलेल्या या मोहिमेस त्यांच्याकडूनच केराची टोपली दाखविली जात आहे. याबाबत पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष साबळे म्हणाले, ग्रामसेवकांनी ग्रामसभेचा सहभागी ठराव देणे आवश्यक असून, एकाही ग्रा.पं.ने तसा ठराव दाखल केला नाही. (वार्ताहर)
तंटामुक्ती अभियानाचा बोजवारा
By admin | Updated: September 2, 2014 01:52 IST