माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील महावितरणचे शाखा कार्यालय आहे. येथून माणकेश्वरसह परिसरातील १५ गावांना वीजपुरवठा केला जाता. मागील काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत खांब उन्मळून पडले होते. परंतु, अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे हे पोल उभारण्यास विलंब होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.एक ते दीड महिन्यापूर्वी माणकेश्वरसह परिसरात वादळी वाऱ्यामुळे मुख्य लाईनचे विद्युतखांब उन्मळून पडले होते. तसेच जागोजागी ताराही तुटल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने संबंधित गावांना तात्पुरत्या स्वरूपात इतर ठिकाणाहून विद्युतपुरवठा करण्यात आला. परंतु, मुख्य लाईनचे पडलेले पोल अद्याप उभे केले नसल्याने शेतीसाठीचा विद्युत पुरवठा बंद आहे. विद्युतपोल तातडीने उभे करण्यात यावेत, यासाठी संबंधित शेतकरी शाखा अभियंत्याकडे वारंवार पाठपुरवा करीत आहेत. अर्ज, विनंत्या करीत आहेत. परंतु, त्यांच्या पाठपुरवाव्याला अद्याप यश आलेले नाही. याचा सर्वाधिक फटका वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. (वार्ताहर)
विद्युत खांब उभारण्यास विलंब
By admin | Updated: July 7, 2016 00:07 IST