पाथरी : मराठवाड्यात सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारा परभणी जिल्हा असतानाही केंद्र शासनाची टेक्सस्टाईल पार्क योजना जिल्ह्याबाहेर गेल्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील २५ वर्षांत जिल्ह्याला दिशाहीन नेतृत्व मिळाल्यामुळे विकास खुंटला गेला असल्याचे प्रतिपादन आ. बाबाजानी दुर्राणी पाथरी येथे व्यापार्यांशी सुसंवाद साधताना केले.
पाथरी शहरातील बाबा टॉवरमध्ये ११ ऑक्टोबर रोजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी शहरातील सर्व व्यापार्यांची बैठक बोलावली होती. याप्रसंगी बालाप्रसाद मुंदडा, राजू पामे, शिवाजीराव चिंचाणे, सत्यनारायण चांडक, माऊली तायनाक, राम कोक्कर, आरेफ खान, दिगंबर लिपणे, पप्पू लाहोटी यांची उपस्थिती होती. व्यापार्यांशी बोलताना दुर्राणी म्हणाले, पाथरी शहरात मागील काही वर्षांत व्यापारपेठ मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने व्यापार्यांच्या दृष्टिकोनातून शहर पुढे येऊ लागले आहे.
पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकांमध्ये आता मोठा फरक जानवत आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या समस्यांवर कोणी बोलताना दिसत नाही. धनदांडग्याची शक्ती वातावरण गढूळ करण्याचे काम करीत आहे. चुकीच्या माणसांना निवडून दिल्यानंतर पाच वर्षे पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे मतदारसंघ विकासापासून वंचितही राहतो.
जिल्ह्यात मागील २५ वर्षांत दिशाहीन नेतृत्वामुळे आर्थिक प्रगती झाली नाही. याप्रसंगी सूत्रसंचालन बा. सु. टेंगसे यांनी केले. बैठकीला शहरातील व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)