नांदेड : चांगल्या अधिकाऱ्यांच्या मी पाठीशी असून दडपशाहीने कोणतेही कामे होणार नाहीत, असा खुलासा केल्यामुळे आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत नगरसेवकांनी सर्वसाधारण सभा कोणताही ठराव मंजूर न करता तहकूब केली़ महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती़ आयुक्तांच्या विरोधात सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सभा बारगळली़ दीड तास चाललेल्या प्रश्नोत्तरानंतर विषय पत्रिकेवरील ठरावावर चर्चा सुरू झाली़ महापालिका क्षेत्रातील मुला- मुलींचे गुणोत्तर प्रमाणाची नोंद या विषयावर चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत़ काही अधिकारी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप केला़ मात्र या आरोपाचे खंडन करीत आयुक्त जी़ श्रीकांत यांनी माझे अधिकारी चांगले कामे करतात़ मी त्यांच्या पाठीशी आहे, असा खुलासा केला़ त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांनीही आयुक्तांच्या या विधानाबद्दल आक्षेप घेतला़ नगरसेवक हा लोकांचा प्रतिनिधी असून सभागृहातील त्यांचा अपमान होत असल्याचा आरोप केला़ तसेच आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली़ महापौर अब्दुल सत्तार यांनी सदस्यांची मागणी मान्य करीत सभा तहकूब केली़ दरम्यान, सभेच्या प्रारंभी नगरोत्थानची रखडलेली कामे, कर्ज प्रकरणावरून नगरसेवकांनी आयुक्तांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला़ काँग्रेसचे नगरसेवक फारूख खान म्हणाले, मागील काही वर्षापासून प्रभागातील विकास कामे खुंटले आहेत़ नागरिकांना सुविधा मिळत नाहीत़ त्यांचा सामना आम्हाला करावा लागत आहे़ तुम्ही आज आहेत, उद्या नाहीत़ मात्र आम्हाला लोकांच्या समस्या सोडवाव्या लागणार आहेत़ काँग्रेसचे गटनेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, सरजिसिंघ गिल यांनी नगरोत्थान योजनेचे अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कर्ज घ्यावे़ यापूर्वी विकास कामे करण्यासाठी महापालिकेने १८० कोटींचे कर्ज घेतले होते़ आता सुद्धा कर्ज घेवून विकासाची कामे गतीने करावीत, अशी मागणी केली़ महापौर अब्दुल सत्तार यांनी, नगरोत्थानची जे कामे थांबले होते़ ते तातडीने पूर्ण करावेत़ तसेच यापूर्वी केलेल्या नगरोत्थानच्या बोगस कामांची चौकशी करून पुढील सभेत अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या़ वसरणी भागात सात दिवसांपासून निर्जळी असल्या प्रकरणी नगरसेवक संजय मोरे यांनी प्रशासनाला जाब विचारला़ एनटीसी मिल पसिरातील घरकुलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला़ भाजपाच्या नगरसेविका गुरूप्रितकौर सोडी म्हणाल्या, तिरूपती ट्रेडींग कंपनी व श्री पीसावा तिरूपती पी़ रामचंद्र या कंपन्यांनी बंदाघाट रोडवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे़ मनपाने यापूर्वी दिलीपसिंघ कॉलनी ते बंदाघाटरोड व दिलीपसिंघ कॉलनी ते गुजराती शाळेच्या मागील बाजुने रोड मंजूर केला होता़ मात्र या दोन्ही रस्त्यावर अतिक्रमण केले आहे़ यासंदर्भात आयुक्त जी़ श्रीकांत यांनी या प्रकरणाची माहिती घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)चुकीच्या गोष्टींना मी कधीही पाठीशी घालणार नाही़ मात्र नगरसेवकांना कोणत्या गोष्टींचे वाईट वाटले कळत नाही़ मी बोलायला तयार होतो़ प्रसंगी मी माफी मागण्यासही तयार होतो़ पण ते ऐकायला तयार नव्हते़ - आयुक्त जी़ श्रीकांत
आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी
By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST