सिल्लोड : कोरोनाच्या संकट काळातही सिल्लोडच्या ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जवळपास ५० कोटीचा निधी आणला. त्यामुळे आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्याअनुषंगाने प्रचार करत सक्षम पॅनल उभे करून भगवा फडकविण्यास निर्धार करा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सिल्लोडला केले.
सिल्लोड तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सिल्लोडच्या सेना भवनात शिवसेनेची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी युवानेते अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे आदी उपस्थित होते. निवडणूक लढताना गाफील राहून चालत नाही, यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागते. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती शिवसनेच्या ताब्यात येतील यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.
- कॅप्शन : सिल्लोडमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र त्रिवेदी.