औसा : शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. कर्जमाफीला आमचा विरोध नाही. पाणीसाठे आणि शाश्वत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करू, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले.लातूर जिल्ह्यात १६ व १७ मार्च रोजी वादळी वारा व गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, औसा तालुक्यातील येल्लोरी, वरवडा शिवारातील नुकसानीची पाहणी त्यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासमवेत रविवारी केली. यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. शेतकऱ्यांनी संकटाचा सामना धैर्याने करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाचा विरोध नाही. मात्र शाश्वत गुंतवणुकीसाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याला प्राधान्य आहे. त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत. गारपिटीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने सुरू असून, अहवाल शासनाकडे आल्यानंतर योग्य ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटाचा सामना धैर्याने करावा. शासन तुमच्यासोबतच आहे, असेही प्रदेशाध्यक्ष दानवे यावेळी म्हणाले. येल्लोरी येथील गुंडाप्पा निटुरे, गुरुराज कुलकर्णी यांच्या शेतातील व वरवडा शिवारातील द्राक्ष बाग, डाळिंब, टोमॅटोची व अन्य पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आ. विनायकराव पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, रमेश कराड, किरण उटगे, महेश पाटील, सूर्यकांत शिंदे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, रोडगे, तहसीलदार अहिल्या गाठाळ, नायब तहसीलदार शशिकांत देवळे, उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक बिराजदार, मंडळ अधिकारी तानाजी यादव, प्रभाकर मुगावे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी
By admin | Updated: March 19, 2017 23:26 IST