शिराढोण : ट्रॅक्टरवरील ताबा सुटून विहिरीत पडल्याने साठवर्षीय वृध्द जागीच ठार झाल्याची घटना कळंब तालुक्यातील पिंपरी (शि) येथे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेले मजूर किरकोळ जखमी झाले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी (शि) येथील प्रल्हाद सदाशिव पाटील (वय ६०) हे नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी शेतातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. दरम्यान, ट्रॅक्टरची बॅटरी खराब असल्यामुळे हे ट्रॅक्टर प्रत्येक वेळी ढकलून चालू करावे लागत होते. त्यामुळे शेतात विहिरीच्या बाजुला लावलेले ट्रॅक्टर मजूर मनोज पाडे हे ढकलत होते. परंतु, त्यांना एकट्याला हे ट्रॅक्टर ढकलले जात नसल्यामुळे पाटील हेही ट्रॅक्टर ढकलण्यासाठी खाली उतरले. दोघांनी मिळून ट्रॅक्टर ढकलून सुरू केल्यानंतर पाटील हे चालत्या ट्रॅक्टरमध्ये चढून स्टेअरिंगवर बसले. परंतु, त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ते ट्रॅक्टरसह विहिरीत पडले. यावेळी मनोज पाडे यांनी आरडाओरड करून पाटील यांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. परंतु, विहिरीत पाणी असल्याने व पाटील हे ट्रॅक्टरला अडकून बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर त्यांना बाहेर काढून मुरूड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, या घटनेत त्यांच्यासोबत असलेले मजूर मनोज पाडे हेही किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर मुरूडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिराढोण पोलिस ठाण्यात कसलीही नोंद झाली नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)
ट्रॅक्टरसह विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
By admin | Updated: December 9, 2015 23:52 IST