उस्मानाबाद : उन्हात झाडे तोडण्याचे काम करीत असलेल्या एका ६५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला़ ही घटना सोमवारी दुपारी उस्मानाबाद शिवारात घडली असून, या प्रकरणी रूग्णालयीन पोलीस चौकीतील डायरीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील रहिवाशी असलेले भागवत सिद्धराम क्षीरसागर (वय-६५) हे सोमवारी सकाळपासूनच शहराच्या शिवारात झाडे तोडण्याचे काम करीत होते़ सकाळी ११ ते ११़३० वाजण्याच्या सुमारास भर उन्हात काम करताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली़ त्यावेळी कामावर असलेल्या इतर कामगारांनी त्यांना तत्काळ उचलून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले़ दरम्यान, भर उन्हात काम केल्याने उष्माघाताने क्षीरसागर यांचा मृत्यू झाल्याचे सहकारी कामगारांसह नातेवाईक म्हणत आहेत़ याबाबत रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़वसंत बाबरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मयताच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे समोर येणार आहे़ शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय मृत्यूचे कारण सांगता येणार नाही़ (प्रतिनिधी)
उन्हात काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू
By admin | Updated: May 27, 2015 00:40 IST