तामलवाडी : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देवीदर्शनाला निघालेल्या भाविकांना वाहनाने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला़ तर दोघे गंभीर जखमी झाले़ रूग्णालयातील जखमींच्या जबाबानंतर कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला ? यावरून बराच काळ गोंधळ सुरू होता़ प्रशासनाच्या गलथान नियोजनाचा फटका अपघातग्रस्तांना बसला असून, रात्रीचे महामार्गावरील गस्तपथकही अपघातस्थळी फिरकले नव्हते़ हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास माळुंब्रा गावच्या शिवारात घडला़पंढरपूर शहरातील कवठेकर गल्लीत राहणारे गौरव जोशी, आकाश अन्नदाते, सागर गायकवाड, योगेश आवताडे, नागेश दहिहंडे, सदानंद कोकरे, प्रथमेश नवलकर हे सात युवक शुक्रवारी रात्री सोलापूर येथून देवी दर्शनासाठी पायी चालत तुळजापूरकडे निघाले होते़ हे युवक शनिवारी पहाटे सांगवी-माळुंब्रा शिवारात आले असता भरधाव वेगातील वाहनाने युवकांना जोराची धडक दिली़ या अपघातात गौरव सतीश जोशी (वय-१८) याचा जागीच मृत्यू झाला़ तर योगेश आवताडे (वय-१९), नागेश दहिहंडे (वय-२० राक़वठेकर गल्ली, पंढरपूर) हे गंभीर जखमी झाले़ इतर मित्रांनी तातडीने जखमींना तुळजापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी सकाळी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ जखमींच्या जबाबानंतर कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला? यावरून काही काळ पोलिसांमध्येच गोंधळ सुरू होता़ त्यानंतर जबाबाची कागदपत्रे तामलवाडी पोलिसांकडे पाठविण्यात आली़ (वार्ताहर)
वाहनाच्या धडकेत देवीभक्ताचा मृत्यू
By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST