औरंगाबाद : बिबट्याच्या तीन पिलांच्या मृत्यूनंतरही सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा निष्काळजीपणा कमी झालेला नाही. प्राणिसंग्रहालयातील अनेक प्राण्यांना अजूनही विविध माध्यमातून यातना देणे सुरूच आहे. पाण्याअभावी मगरींचे हौद कोरडे पडले आहेत. तर बगळ्यांच्या हौदातही पाण्याचा अभाव आहे. किती तरी दिवसांपासून या हौदांमध्ये पाणी टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या प्राण्यांना त्रास सहन करावा लागत आहे.मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयात वाघ, हत्तींसह २३ प्रजातींचे सुमारे ३१० वन्यप्राणी आहेत. हे प्राणी पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे ७ लाख लोक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. मात्र, सध्या येथील अनेक प्राण्यांना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागत आहे. बिबट्याच्या तीन नवजात पिलांचा जन्मानंतर ३६ तासांत मृत्यू झाला. रेणू बिबट्याच्या गरोदरपणाबद्दल अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांनी तिची योग्य काळजी घेतली नाही. शिवाय मादी बिबट्याला आजारी समजून तिला औषधांचे हाय पॉवर डोस दिले गेले. याचा परिणाम मुदतपूर्व प्रसूती होऊन अशक्तपणामुळे तिची तिन्ही पिल्ले दगावली. या गंभीर घटनेनंतरही प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. बिबट्याप्रमाणेच मगरी आणि बगळ्यांनाही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. प्राणिसंग्रहालयात सध्या लहान मोठ्या सहा मगरी आहेत. त्यांच्यासाठी हौद करण्यात आलेले असून, त्यात सदैव भरपूर पाणी असणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून हे हौद रिकामे पडले आहेत. त्यात तळाला अगदी थोडेच पाणी शिल्लक असून तेही महिना दोन महिन्यांपासून बदललेले नाही. त्यामुळे त्यात घाण साचली आहे. बगळ्यांची अवस्थाही काहीशी अशीच आहे. याठिकाणी हत्तींच्या समोरील भागात बगळ्यांना जाळीदार घरात ठेवण्यात आलेले आहे. त्यात पाण्याचा मोठा हौद आहे. दिवसभर हे बगळे येथे पाण्यात खेळत असतात. मात्र, याठिकाणीही सध्या जेमतेम पाणी आहे. त्यातील पाणी किती तरी दिवसांपासून बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे पाण्यात घाण तयार होऊन याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. या परिस्थितीविषयी प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी पाणीटंचाईचे कारण दिले. पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.
मुक्या प्राण्यांनाही मरणयातना
By admin | Updated: March 14, 2016 00:56 IST