बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बोगस सातबारा तयार करून कर्ज उचलल्या प्रकरणी अकरा जणांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. शिक्षेच्या विरोधात आरोपी अपिलात गेले होते. अपील फेटाळून लावत जिल्हा व सत्र न्या. आर.बी. अग्रवाल यांनी त्यांची एक वर्षाची शिक्षा मंगळवारी कायम ठेवली.बीड तालुक्यातील कुर्ला सेवा सहकारी सोसायटीत सातबारावर खोट्या नोंदी करत ४ लाख ४२ हजार रुपये उचलून बँकेची फसवणूक केल्याचे तत्कालिन लेखा परीक्षक दिनकर ढाकणे यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी १९९४ मध्ये पेठबीड पोलीस ठाण्यात अकराजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.२००६ मध्ये न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला होता. त्यानंतर आरोपींनी शिक्षेच्या विरोधात बीड येथील जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या अपिलावर मंगळवारी सुनावणी झाली. न्या. आर.बी. अग्रवाल यांनी आरोपी निवृत्ती गुंड पाटील , केरबा गुंड, सुशिला गुंड, अनिल गुंड, आसराबाई गुंड, सुलाबाई गुंड, मंदाकिनी गुंड, रामराव राजगुरू, रावसाहेब बलगुजर यांची शिक्षा कायम ठेवली. जनाबाई गुंड, त्रिंबक पाटील व बी.आर. महाजन हे तिघे मयत झाले आहेत. त्यामुळे ९ आरोपी आता शिक्षा भोगणार आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकिल अजहर अली यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
डीसीसीला फसविणाऱ्या आरोपींची शिक्षा कायम
By admin | Updated: April 22, 2015 00:41 IST