सय्यद लाल
बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा न करता रात्री वीज मिळत असल्याने हा वीज पुरवठा त्यांच्या जीवावर उठला आहे. पिकांवर पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री घराबाहेर पडावे लागत असल्याने जीव मुठीत घेत कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसा विजपुरवठा खंडित न करता कायम वीज द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यंदा बाजारसावंगीसह जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने सर्वत्र मुबलक पाणी आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला. मात्र त्याची कसर रब्बी हंगामातून काढण्याच्या दृष्टीने बळीराजा तयारीस लागला आहे. विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध असल्याने पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र महावितरणकडून ग्रामीण भागात बहुतांश वेळा दिवसा विजपुरवठा खंडित करत रात्री तो देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यात थ्री फेजसाठीचा वीज पुरवठा आहे. महिन्यातून किमान पंधरा दिवस हे रात्रीचे शेतकऱ्यांना वीज मिळत असल्याने रात्रीच्या अंधारात त्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यादरम्यान साप, विंचूसह इतर हिंस्र प्राण्यांची दहशत असताना सुद्धा जीवाची बाजी लावून पिकांना पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासह मराठवाड्यात सध्या बिबट्याची दहशत असून अनेक ठिकाणी त्याने नागरिकांसह प्राण्यांवर हल्ला करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळे महावितरणने शेतकरी हिताचा विचार करून दिवसा विजपुरवठा द्यावा, अशी मागणी होत आहे.
-------------
- पहिल्या आठवड्यात सकाळी ९-३५ ते सायंकाळी ५-३५
- दुसऱ्या आठवड्यात रात्री ८-१५ ते सकाळी ६-१५
- तिसरा आठवड्यात सकाळी ९-३५ ते ५-३५
- चौथ्या आठवड्यात रात्री ८-१५ ते ६-१५
--------------
रात्रीचा विजपुरवठा नको
सध्या दोन आठवडे दिवसा तर दोन आठवडे रात्रीचा विजपुरवठा महावितरणकडून करण्यात येत आहे. रात्रीचा विजपुरवठा शेतकऱ्यांना जीवघेणा व धोक्याचे असल्याने दिवसाच्या टप्प्यात सलग वीज मिळाली तर शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देणे फायद्याचे होईल.
- अजिनाथ नलावडे, शेतकरी
-------------
पाणी मुबलक मात्र ...
यंदा पावसाने सुरेख साथ दिल्याने विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी असल्याने बाजारसावंगीसह परिसरातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, उसाची लागवड केली आहे. पाणी मुबलक प्रमाणात असतानाही रात्रीच्या विजपुरवठ्यामुळे मुबलक पाणी असतानाही सुद्धा पिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी देता येत नसल्याने उत्पादनात घट होणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी रात्रीचा विजपुरवठा हा दिवसा किमान दहा तास पूर्ण दाबाने व्हायला हवा.
- कारभारी साळुंके, शेतकरी
-------------
वीज मंडळाने ठरवून दिलेली वेळ
वीज मंडळातर्फे थ्री फेज शेतीसाठीच्या विजपुरवठा हा दोन टप्प्यात करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पंधरा दिवस दिवसा तर पंधरा दिवस रात्री अशा पद्धतीने वीज मंडळाने ठरवून दिलेल्या वेळेत रात्री दहा तास तर दिवसा आठ तास नियमानुसार देण्यात येत आहे. आम्ही शासनातर्फे आलेल्या निर्णयाचे पालन करीत आहोत.
- यु.बी. खान, सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय खुलताबाद