औरंगाबाद : महापौर कला ओझा यांनी पदाचा गैरवापर करून केलेल्या भ्रष्टाचाराच्या मागणीसह नंदनवन कॉलनी, भीमनगर वॉर्डात पाणीपुरवठा सुरळीत करणे व रस्त्यांची कामे करणे आणि शहरातील सर्व वॉर्डांत समान निधी देण्याच्या मागणीसाठी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी आजपासून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे.१३ जून रोजी प्रवास व पाहुणचार भत्त्यात महापौरांनी हात धुऊन घेतल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी केला होता. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करून पोलिसांत तक्रार द्यावी, अशी मागणी करीत दाभाडे यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांना खा. चंद्रकांत खैरे हे बळ देत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या प्रकरणात पालिका प्रशासन काहीही करू शकत नाही. दाभाडे यांनी राज्य शासनाकडे पुराव्यानिशी दाद मागावी, असे मत मनपातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. महापौर आल्या नाहीत मनपात महापौर कला ओझा आज पालिकेत आल्याच नाहीत. विक्रीकर विभागातील काही अधिकाऱ्यांसोबत त्या बैठक घेणार होत्या. मात्र, त्या पालिकेत का आल्या नाहीत, याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान शिवसेनेचे एक शिष्टमंडळ जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांना भेटले. निवेदनात म्हटले आहे की, २० मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक दाभाडे यांनी जाळलेल्या अर्थसंकल्पात थोर पुरुषांची छायाचित्रे होती. याप्रकरणी दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. दाभाडे यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात तशी काही छायाचित्रे नव्हती. शिवसेना सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे.
महापौरांच्या विरोधात धरणे आंदोलन
By admin | Updated: June 17, 2014 01:09 IST