पूर्णा : पावसाळ्यातील दीड महिना उलटला परंतु अजूनही पाऊस रुसलेलालच आहे. त्यामुळे एकीकडे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत तर दुसरीकडे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत.मृगनक्षत्राच्या आगमनापूर्वीच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली. मृग नक्षत्राच्या पावसावर पेरणी होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु दोन नक्षत्रानंतरही पाऊस झाला नाही. आठवड्यापूर्वी काही भागात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु बहुतांश पेरण्या बाकी आहेत. आठवड्यापासून सर्वदूर ढगाळ वातावरण राहत आहे. ढग दाटूनही पाऊस मात्र पडत नाही. निसर्गाच्या या लपंडावामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. लांबणीवर पडलेल्या पावसामुळे मूग, उडदासारखी नगदी पिके हातून गेली. पावसाच्या पाण्यावर लावलेली उसाची लहान पिके सुकू लागली आहेत तर फळ बागांना भांड्याने पाणी घालावे लागत आहे. तालुक्यात सोयाबीन व कापूस ही पिके घेतली जातात. अनेक शेतकऱ्यांनी विहीर व कालव्याच्या पाण्याच्या भरोशावर पेरण्या केल्या. परंतु उमलणाऱ्या पिकांवर तुडतुडे व इतर किटकांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. पाऊस नसल्याने ओला चाराही मिळत नाही. परिणामी दुग्धव्यवसाय धोक्यात आला आहे. येत्या आठवड्यात पेरणी योग्य पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)मृग बहार फुटलाच नाहीउन्हाळ्याच्या शेवटी येणाऱ्या मृग बहरात मोसंबी पिकांचे मोठे उत्पादन होते. अपेक्षित हवामान व पाण्यामुळे यावर्षी मृग नक्षत्रात येणारा मृग बहार फुटला नसल्याने फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आहेत ती झाडे जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पूर्णेत फळबागा धोक्यात
By admin | Updated: July 20, 2014 00:35 IST