लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची मंगळवारी सभा झाली. बैठकीत हात उंचावून मतदान करण्यात आले. यात जयप्रकाश दांडेगावकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शहाजी देसाई यांची निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे हे होते. तर सहाय्यक म्हणून नायब तहसीलदार कृष्णा कानगुले उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर विठ्ठल भोसले या दोघांचे दोन अर्ज दाखल झाले. उपाध्यक्षपदासाठी शहाजी देसाई, राजेंद्र जाधव, प्रल्हाद काळे, भगवान धस या चौघांचे अर्ज होते. दोघांनी अर्ज परत घेतल्यानंतर देसाई व धस हे मैदानात राहिले. हात उंचावून मत नोंदवले. यात अध्यक्षपदासाठी दांडेगावकरांना व उपाध्यक्षपदासाठी देसाई यांना १६ तर विरोधात प्रत्येकी पाच मते पडली. बैठकीस सर्व २१ संचालक हजर होते. निकाल जाहीर होताच पूर्णा कारखाना परिसरात प्रचंड आतषबाजी झाली. वसमत शहरास तालुक्याच्या विविध गावातही प्रचंड आतषबाजी करत सभासदांनी आनंद व्यक्त केला. नवनिर्वाचितांच्या सत्कारासाठी सभासद, शेतकरी, कार्यकर्ते आदींनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी दांडेगावकर म्हणाले, पूर्णा कारखाना ही सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी चालणारी संस्था आहे. येथे आजवर राजकारण येऊ दिले नाही. केवळ सभासदांचे हित व ‘पूर्णा’ व्यवस्थित चालला पाहिजे, यावरच लक्ष केंद्रित केले. भविष्यातही पूर्णा शेतकरी सभासदांच्या हितालाच प्राधान्य देईल. पूर्णा राजकारणमुक्त राहील. सभासदांचा विश्वास कायम असल्यानेच निवडणुकीत सभासदांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे.
अध्यक्षपदी दांडेगावकर
By admin | Updated: July 4, 2017 23:41 IST