अशोक कांबळे , वाळूज महानगरवेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी जप्त केलेली वाहने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून तशीच धूळखात पडून आहेत. वाहनांना गंज लागला असल्याने अनेक वाहने भंगारात जमा झाली असून अनेकांचे स्पेअरपार्ट गायब झाले आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अपघात, चोरी इ. वेगवेगळ्या प्रकरणांत मुद्देमाल म्हणून वाहने जप्त केली आहेत. २००१ पासून अद्यापपर्यंत जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. यात दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जप्त केलेल्या वाहनांचे मूळ मालक पोलिसांना अद्याप सापडले नसल्याने व वाहन मालकांनीही वाहने परत आणण्याची तसदी न घेतल्यामुळे ही वाहने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून तशीच पडून आहेत. जप्त केलेली वाहने मूळ मालकाने वाहनाची कागदपत्रे सादर केल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार दंड भरून मालकाला परत दिली जातात; परंतु वाहनांचे मूळ मालक न मिळाल्यास न्यायालयाच्या परवानगीने या वाहनांचा लिलाव केला जाऊ शकतो. या लिलावातून शासनाला आर्थिक फायदाही होतो; परंतु या वाहनांसंदर्भात संबंधित प्रशासनाकडून तसे काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्यामुळेच अनेक वर्षांपासून तशीच पडून असलेल्या वाहनांना गंज चढला आहे. अनेक दुचाकी, रिक्षा ही वाहने गंज लागून जीर्ण होत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक वाहनांचे चक्क स्पेअरपार्टच गायब झाले आहेत. पोलीस ठाण्यातून वाहनांचे सुटे भाग कसे काय जातात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ४वेगवेगळ्या प्रकरणांत पोलिसांनी जप्त केलेली वाहने परत नेण्याकडे वाहन मालकांचे दुर्लक्ष आहे. अपघात झालेले वाहन अपशकुन समजून ते वाहन परत नेण्यासाठी मालक उत्सुक नसतात. त्यामुळे ते वाहन पोलीस ठाण्यात तसेच पडून राहते. चोरी अथवा अन्य कारणासाठी वापरलेले चोरीचे वाहन रस्त्यावर तसेच सोडले जाते. बेवारस म्हणून ते पोलीस ठाण्यात जमा केले जाते; परंतु त्याची मूळ मालकाला माहिती नसल्याने ते पोलीस ठाण्यात राहते.
जप्तीच्या वाहनांना चढला गंज
By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST