अनिल महाजन, धारुरतालुक्यात वादळी - वाऱ्याच्या तडाख्याने फळबागा उद्धवस्थ झाल्या. नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये असताना प्रशासनाने मात्र, केवळ १७८ एकरवरील पिकांना बाधा पोहोचल्याचा जावईशोध लावला आहे. त्यामुळे कमालीचे आश्चर्य होत असून फेरपंचनाम्याची मागणी पुढे आली आहे.सलग पाच दिवस अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले. खरीप, रबी पिके वाया गेल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचे गणित बिघडून गेले होते. पाणीटंचाईवर मात करत हजारो रुपये खर्च करुन काही शेतकऱ्यांनी कशाबशा फळबागा जोपासल्या. पिकेही चांगली आली;पण ऐन काढणीच्या वेळीच निसर्गाने वक्रदृष्टी फिरवली. त्यामुळे होत्याचे नव्हते झाले. सुकळी, देवठाणा, महातारगाव, मुंंगी, वाका या गावांतील टरबूज, खरबुजांचे पिक वाया गेले. मुंगी येथील शेतकरी अशोक सोळंके यांचे दोन एरवरील टरबूज वाया गेले. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला. अशीच आपत्ती इतर शेतकऱ्यांवरही ओढावली. गारांचा मारा इतका जबर होता की, टरबूज, खरबुजांचे जागेवरच दोन तुकडे पडले. शिवाय मका, ऊस, भेंडी या पिकांचेही मोठे नुकसान झाले.दरम्यान, प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले;परंतु केवळ १७८ एकरवर नुकसान झाल्याचा अहवाल दिल्याने पंचनाम्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तालुक्यात ६३२ हेक्टरवर फळबाग लाडवड आहे. मात्र, ७१ हेक्टरवरच नुकसान झाल्याचे दाखविल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप होऊ लागला आहे. विशेष म्हणजे तालुक्यात आंब्याचे उत्पादनही मोठे आहे. यंदा गारपिटीने कैऱ्या झडल्या. त्यामुळे आंबा उत्पादन करणाऱ्या तालुक्यालाच इतर ठिकाणच्या आंब्यांवर समाधान मानावे लागणार आहे.देशमुख यांचा बांधावरुन दौराआ. आर. टी. देशमुख यांनी नुकसानीच्या पाहणीसाठी नुकताच दौरा केला. काटेवाडी येथे केळीच्या बागा गारपिटीने भूईसपाट झाल्या. मात्र, देशमुख तेथे फिरकलेही नाही. शेजारच्या गावांमध्ये बांधावरुन त्यांनी पिकपाहणी दौरा आटोपला. त्यामुळे आ. देशमुख यांचा दौरा दिलासा देण्यासाठी होता की, देखाव्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नुकसान हेक्टरमध्ये; पंचनामे एकरात!
By admin | Updated: April 16, 2015 01:00 IST