औरंगाबाद : ‘नरेंद्र मोदी यांचे सरकार संविधान बदलणार नाही. जर संविधान बदलण्याचा कुणीही प्रयत्न केला तर त्यांना बदलण्याची ताकद या देशातील दलित जनतेत आहे,’ असा इशारा स्पष्ट शब्दांत एका पत्रपरिषदेत रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी दिला. त्यांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. इतकेच नव्हे तर संविधानावर विशेष अधिवेशन बोलवून चर्चा केली व त्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान संपूर्ण जगासमोर त्यांनी अधोरेखित केले. इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाच्या कामाला गती देण्यात यावी, यासाठी आजच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. १४ एप्रिलपासून या कामाला सुरुवात व्हावी, असा आमचा आग्रह आहे. आम्हाला दिलेली आश्वासने मोदी व फडणवीस सरकार पाळील, असा आमचा विश्वास आहे. रिपाइंला सत्तेत वाटा देण्याचे एका कराराद्वारे कबूल करण्यात आले आहे. बाबूराव कदम, मिलिंद शेळके, अनिल गोंडाणे, गौतम भालेराव, ब्रह्मानंद चव्हाण, दौलत खरात, आर. डी. इंगळे गुरुजी, श्रावण गायकवाड, प्रशांत शेगावकर, सुंदर साळवे, किशोर थोरात, संजय ठोकळ, अरविंद अवसरमोल, रमेश मकासरे आदींची उपस्थिती होती.
‘संविधान बदलणाऱ्यांना दलित जनताच बदलेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:14 IST