सेलू : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील ग्राहक वैतागले असून वेळेवर वीज बिले वाटप न होणे तसेच अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकाच्या माथी मारल्या जात असल्यामुळे ग्राहकात संताप व्यक्त होत आहे़ शहरात वीज वितरण कंपनीचे मोठया प्रमाणावर ग्राहक असून इतर तालुक्याच्या तुलनेत वेळेवर वीज बिले अदा करणारे ग्राहक आहेत़ वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा फ टका ग्राहकांना बसत आहे़ सहा महिन्यापुर्वी शहरात वीज वितरण कंपनीकडून नवीन मीटर बसविण्यात आले होते़ त्यानंतर आॅगस्ट महिन्यात काही ग्राहकांना त्यावेळच्या रिडींगचे बिले देण्यात आली आहेत़ त्यामुळे ग्राहकही वीज बिल पाहून चक्रावले आहेत़ वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वेळेवर बिले मिळत नाहीत़ त्यामुळे पुढच्या महिन्यात आलेल्या बिलात मागील बिलाचा आकडा येत आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडत आहे़ तर काही ठिकाणी चुकीच्या रिडींग आधारे बिले आली असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. संबंधित यंत्रणेकडून वीज बिल वितरण व रिडींग घेण्याचे काम गांभिंर्याने व वेळेवर होत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे़ मागील पाच महिन्यापासून वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळलेला आहे़ सहाय्यक अभियंता म्हणून सेलू येथे पाच महिन्या पासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या़ त्यामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे़ शहरात दररोज तीन तासाचे भारनियमन सुरू आहे़ त्यातच बिल वितरण व बिलांमध्ये चुका होत असल्यामुळे ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहे़ याबाबत कुठलीही सविस्तर माहिती ग्राहकांना दिली जात नसल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत़ कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फ टका ग्राहकांना बसत आहे़ (प्रतिनिधी)मागील वर्षी भारनियमनमुक्त सेलू शहर पुन्हा भारनियमनाच्या कचाटयात सापडले आहे़ तत्कालीन सहाय्यक अभियंता सतीश बाहेती यांच्या पुढाकारातून वीज बिल वसुलीत सेलू पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे वर्षभरापुर्वी शहर भारनियमनमुक्त झाले होते़ परंतू सतीश बाहेती यांची फेब्रुवारी महिन्यात देगलूर येथे बदली झाल्यामुळे पाच महिन्यांपासून प्रभारी अधिकारी नेमण्यात आले़ त्यामुळे क ार्यालयीन कामावर कुठलेही नियंत्रण राहिले नाही़ चुकीची वीज बिले, बिले वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले़ बाहेती यांच्या बदलीनंतर राऊत यांच्याकडे काही महिने अतिरिक्त पदभार तर जिंतूरच्या अधिकाऱ्यांकडे काही दिवस कारभार देण्यात आला होता़ सात दिवसांपूर्वी घनबहादुर हे सहाय्यक अभियंता म्हणून रूजू झाले आहेत़ यानंतर तरी वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे़
महावितरणच्या गलथान कारभाराला ग्राहक वैतागले
By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST