वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत शुक्रवारी (दि. २९) होणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता शिगेला पोहचली असून, सरपंचपदाच्या दावेदारांचे ठोके वाढले आहेत. आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाळूज महानगर परिसरातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, निकालही जाहीर झाले. या निवडणुकीत रांजणगाव, तीसगाव, पंढरपूर, आंबेलोहळ वगळता इतर ठिकाणी चित्र अस्पष्ट असल्याने या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापित राजकीय पदाधिकाऱ्यांना ‘जोर का झटका’ देत आस्मान दाखविले होते. या निवडणुकीत रांजणगावातून माजी सभापती विठ्ठल कोळेकर, वाळूजचे माजी सरपंच तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, पंढरपूरच्या माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती उपसभापती लताबाई कानडे, विद्यमान सरपंच शेख अख्तर, वाळूजचे माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर बोरकर आदींना नवख्या उमेदवारांनी धूळ चारली होती. या प्रस्थापित राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर विद्यमान अनेक सदस्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवित नवीन दमाच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला होता.
सरपंचपदाच्या दावेदारांचे ठोके वाढले
उद्योगनगरीतील जोगेश्वरी, रांजणगाव, वाळूज, पंढरपूर, नारायणपूर, वळदगाव आदी आर्थिकदृष्ट्या श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपात रस्सीखेच सुरू आहे. संभाव्य आरक्षण सोडतीचा अंदाज घेऊन वाळूजच्या माजी सरपंच सईदाबी पठाण व जोगेश्वरीच्या सरपंच सोनुताई लोहकरे यांनी बहुमतासाठी लागणाऱ्या सदस्यांची जुळवाजुळव करीत त्यांना सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना केले आहे.
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
सरपंचपदाची शुक्रवारी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन आरक्षण सोडत कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे वाळूज महानगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
------------------------------------------