जाफराबाद येथील घटना : ठाण्यातून केले पलायनलोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : गणेश उत्सवाच्या काळात न्यायालयाच्या आदेशाने स्थानबद्ध केलेल्या आरोपीने जाफराबाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस ठाण्यातून पलायन केले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.पोलिसांच्या ताब्यातून पळालेला आरोपी शेख महेमूद शेख हनीफ याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (जालना) यांच्या आदेशान्वये तारीख १६ आॅगस्ट रोजी स्थानबद्ध करण्यात आले होते. पोलीस हवालदार भास्कर गणपत जाधव हे शनिवारी सायंकाळी आरोपीस वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याचे नियोजन करत असताना त्यांना गुंगारा देत शेख महेमूद याने धूम ठोकली. पोलीस शनिवारी रात्रीपासून त्याचा शोध घेत आहेत.या प्रकरणी पोलीस हवालदार भास्कर गणपत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलिसांनी आरोपी शेख महेमूदविरुद्ध जाफराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक श्रीमंत ठोंबरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे यांनी रविवारी जाफराबाद ठाण्याला भेट देऊन या प्रकाराबाबत माहिती घेतली.
पोलिसांना गुंगारा देऊन गुन्हेगार फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:11 IST