कळंब : सुसज्ज अशा खाजगी इमारतीत कळंब येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. यात ३२ विद्यार्थी सध्या राहत असून, लोकमत प्रतिनिधीने येथे पाहणी केली असता येथील खाटांची व गाद्यांची दुरवस्था झाल्याचे दिसून आले. शिवाय सोलर वॉटर नसल्याने मुलांना थंड पाण्यानेच स्नान उरकावे लागत असल्याचे निदर्शनास आले.कळंब शहरात महाराष्ट्र शासन चालवत असलेले शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. परंतु अनेक कळंबकरांना अजूनही ज्ञात नाही. यातही प्रस्तुत प्रतिनिधीने गटशिक्षण अधिकारी कार्यालयात ठावठिकाणी विचारला असता त्यांनाही याचा पत्ता नव्हता. अखेर प्रस्तुत प्रतिनिधीने याचा ठावठिकाणा माहिती करुन घेवून शहराच्या अंतिम भागात असलेल्या वसतिगृहात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. वसतीगृहाच्या गेटवरच सुरक्षा रक्षकांनी आत जाण्यास मज्जाव केला. ओळख, पाळख दाखवून प्रवेश मिळवून धांडोळा घेतला असता, भौतिकदृष्ट्या इमारत चांगली व स्वच्छ असल्यातरी अनेक बाबी यावेळी समोर आल्या.या वसतिगृहात ७५ विद्यार्थ्यांच्या राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आकृतीबंधानुसार ९ कर्मचाऱ्यांच्या पदास मान्यता आहे. असे असले तरी येथील गृहपालासारखे प्रमुखपद नोव्हेंबरपासून रिक्त असून, लिपिकावरच पूर्ण प्रशासकीय व व्यवस्थापकीय जबाबदारी येत आहे. तसेच शिपायाचेही एक पद रिक्त आहे. एका खाजगी तीन मजली इमारतीमध्ये या वसतीगृहाचे कामकाज सुरु असून, सद्यस्थितीत ३२ विद्यार्थी प्रवेशित असल्याचे सांगण्यात आले. या इमारतीमध्ये धांडोळा घेत असताना कोणी ना कोणी कर्मचारी मागावर असायचा. यामुळे उपस्थित असलेले विद्यार्थी सकारात्मकच बोलत होते. यातही खोल्याची अवस्था, इमारतीची अवस्था ठीकठाक असली तरी विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी असलेल्या खाटांची अवस्था अशीतशीच दिसून आली. गाद्याही जागेवर झिजलेल्या व कोमट वास येणाऱ्या दिसून आल्या. यावर वसतिगृहाच्या प्रमुखांना छेडले असता, त्यांनी ७५ कॉट आणि गाद्यांची वरिष्ठांकडे मागणी केली असल्याचे सांगितले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असताना येथे मात्र विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी थंड पाण्यानेच स्नान उरकावे लागत आहे. येथील सोलर वॉटर युनिट इमारतीच्या मालकाने अटकाव केल्याने इतरत्र नेले. यामुळे विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. (वार्ताहर)कर्मचारी म्हणतात, विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था चोखस्वयंपाकगृहाच्या स्वतंत्र कक्षाची पाहणी करण्याची विनंती केली असता, प्रभारी गृहपालाने चावी उपलब्ध नसल्याचे सांगितले. वसतिगृहामधील विद्यार्थ्यांनी जेवणाच्या व नाश्त्याबाबतीत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. असे असले तरी स्वयंपाकगृह उघडे नसल्याने आतील स्वच्छता, अन्नधान्याची, फळभाज्याची प्रत याबाबत पाहणी करता आली नाही. विद्यार्थ्यांना दूध, पोहे, तूप यापासून ते सफरचंद, वरण, भात, चपाती ते मासांहार या नियमित खाण्याची चोख व्यवस्था होत असल्याचे सांगण्यात आले. तेही कर्मचाऱ्यांच्या तोंडातूनच.संगणक कक्षही कुलूपबंदया वसतिगृहात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे गिरवायला मिळावेत, यासाठी ७ संगणक संच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. यासाठी स्वतंत्र संगणक कक्षही उपलब्ध झाले. परंतु हा संगणक कक्ष कुलूपबंद आढळला. याबाबत विद्यार्थ्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, कधीमधी संगणकावर बसत असल्याचे दबकत दबकत सांगण्यात आले. प्रभारी गृहपालाना याविषयी विचारले असता, संगणक मीच शिकवतो, असे ते म्हणाले.
मोडके कॉट अन् कुजलेल्या गाद्या
By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST