बीड : पाणी पुरवठ्याचे नियम डावलून मागील तीन वर्षात टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी (जि. प. पाणीपुरवठा विभागाचा पाण्यावरील खर्च वगळून) ८७ कोटी ६ लाख ११ हजार रूपयांचा खर्च झालेला असून फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात केवळ टँकरवर १५ कोटी २५ लाख रुपयांचा चुराडा झालेला आहे. अजून उन्हाळ्याचे दोन ते तीन महिने शिल्लक आहेत. एवढा मोठा खर्च होऊनही नियोजना अभावी जिल्हा तहानलेलाच आहे.मागील तीन वर्षात बीड जिल्ह्यात केवळ टँकरवर टंचाई विभागातून ८७ कोटी ६ लाख ११ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. खर्च कसला अक्षरश: चुराडाच झालेला आहे. २०१४ दरम्यान शासनाने ज्या ठेकेदारांच्या टँकरला जीपीआरएस सिस्टीम बसवलेली नाही अशा पाण्याच्या टँकरचे बील काढू नये अशा सूचना दिल्या होत्या. यावरून बीड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सात कोटी रूपयांच्या जवळपास टँकरची बिले रोखून धरली होती. मात्र तत्कालीन मंत्र्यांच्या कृपाशिर्वादाने ठेकेदारांनी मंत्रालयातून पूर्वीचा जीआर बदलून आणल्याने जि. प. ला जीपीआरएस सिस्टिम नसलेल्या ठेकेदारांचे देखील टँकरची बिले द्यावे लागले होते.पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय...नागरिकांना पिण्याचे पाणी पाजण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करूनही जिल्ह्यातल्या सर्व सामान्य माणसाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)
१५ कोटींचा चुराडा
By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST