औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आमदार होण्यासाठी तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे किशनचंद तनवाणी, काँग्रेसतर्फे माजी आमदार एम.एम. शेख, अपक्ष म्हणून अफसर खान, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, बसपातर्फे संजय जगताप यांनी आज आपले अर्ज दाखल केले. भाजपाचे किशनचंद तनवाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी अपक्ष म्हणून मिरवणुकीने जाऊन अर्ज दाखल केला. तनवाणी यांनी गुलमंडीवरून भाजपा या आपल्या नव्या पक्षाच्या बॅनरखाली शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना शह देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे माजी आमदार एम.एम. शेख यांची उमेदवारी शनिवारी पहाटे निश्चित झाली आणि त्यांना मध्य मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज एम.एम. शेख यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासमवेत शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बोरसे, जेम्स अंबिलढगे उपस्थित होते. अफसर खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने विनोद पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडाचा झेंडा उभारत आज आपल्या शेकडो समर्थकांसह मिरवणूक काढून अर्ज दाखल केला. बेगमपुरा भागातून त्यांनी रॅली काढली. काँग्रेसचे कार्यकर्ते संजय जगताप यांनी औरंगाबाद पश्चिम या राखीव मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, तिथे जितेंद्र देहाडे यांना उमेदवारी मिळाल्याने जगताप हे बसपाच्या छावणीत दाखल झाले. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवनाथ राठी यांनीही आपला अर्ज दाखल केला. औरंगाबाद मध्य मतदारसंघात शनिवारी एकूण ३७ उमेदवारांचे ४२ अर्ज दाखल झाले. आज निघालेल्या दोन रॅलीमुळे निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे चित्र दिसत होते.
मध्य मतदारसंघात उमेदवारांची गर्दी
By admin | Updated: September 28, 2014 01:03 IST