पाटोदा: येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमधून शेतकऱ्यांना तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या वर्षी तब्बल ७० कोटी रुपयांचा पीक विमा मिळालेला आहे. गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले व ज्यांनी विमा भरला होता अशांना ही रक्कम मिळालेली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमधून तब्बल १ लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटण्यात येत आहे. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना ४५ दिवसांपासून पीक विमा सुरू आहे. येथील शाखेत कर्मचाऱ्यांची वाणवा असतानाही सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटण्यात आल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पीक विमा वाटप करताना अनेकदा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. कधी-कधी गोंधळही झाला. यामुळे पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. असे असतानाही साडेतीन कोटी रुपयांचे वाटप केल्याचे शाखाधिकारी कैलास इंगळे यांनी सांगितले. सध्या शेतकरी मशागतीसह बियाणे, खत खरेदी करीत आहेत. अशावेळी पैसे मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
साडेतीन कोटींचा पीक विमा वाटप
By admin | Updated: June 22, 2014 00:04 IST